Ganeshotsav 2026 | २५ गावांत एकच गणपती; कळे परिसरात विधायक गणेशोत्सवाची परंपरा

कळे पोलिसांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉल्बीमुक्त उत्सवाबरोबर सामाजिक उपक्रमांवर भर
One Village One Ganpati
One Village One Ganpati AI Photo
Published on
Updated on

Kale One Village One Ganpati

रविंद्र पाटील

कळे : कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २५ गावांमध्ये यंदा ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा सुरू असून, यंदा कळे पोलिसांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील एकी आणि सामाजिक सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुमारे ५४ गावे आणि २२ वाड्यांचा समावेश आहे. एका गावात अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असल्यास मंडळांमध्ये अनावश्यक स्पर्धा आणि त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच गणेशोत्सवाच्या नावाखाली होणारा अनावश्यक खर्च टाळून गावातील एकीची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने पोलिस प्रशासनाकडून ‘एक गाव, एक गणपती’चा आग्रह करण्यात आला आहे.

One Village One Ganpati
Palghar Ganeshotsav: पालघर जिल्ह्यात गणेशोत्सोवाचा उत्साह; १२,५६४ गणपती आणि ८४४ गौरींचे होणार आगमन

कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम यांनी गेल्या महिनाभरापासून गावोगावी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेतल्या. यावेळी ध्वनिक्षेपक आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. पोलिसांच्या या आवाहनाला मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यांसह विविध सामाजिक आणि विधायक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात येत आहे.

कळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही गावांमध्ये यापूर्वीपासूनच ‘एक गाव, एक गणपती’ची परंपरा आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे यंदा या उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, ‘एक गाव, एक गणपती’ आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव राबविणाऱ्या गावांचा पोलिस प्रशासनाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे.

One Village One Ganpati
Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशमूर्ती खरेदीसाठी पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; हे रस्ते राहणार बंद!

‘एक गाव, एक गणपती’ राबविणारी गावे

गोठे, वाळवेकरवाडी, पडसाळी, मुगडेवाडी, साळवाडी, तांदुळवाडी, माजनाळ, चाफेवाडी, सुळे, मेंगाणेवाडी, कुंभारवाडी, नवलेवाडी, बांद्रेवाडी, मोरेवाडी, मल्हारपेठ, वाळोली, आतकिरवाडी, पिसात्री, मोताईवाडी, काळजवडे, सुंभेवाडी, तळेवाडी, निवाचीवाडी, बळपवाडी आणि जाधववाडी.

गणेशोत्सवाच्या काळात ग्रामपंचायती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठका घेऊन पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये एकीची भावना रुजण्यास निश्चितच मदत होईल.

- दीपक कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news