कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरातील तरुणांकडून गेली पाच वर्षांपासून कॅन्सग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी नो शेव्ह नोव्हेंबर मोहिम राबवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करता त्यावर होणारा खर्च वाचवून ते पैसे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी या तरुणांकडून दिले जातात. ६०० हून अधिक तरुण या मोहिमेत सहभागी झाले आहेत. शुक्रवारी (दि. २ डिसेंबर) या तरुणांकडून ८ ते ९ कॅन्सरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यात येणार आहे..
नो शेव्ह नोव्हेंबर मोहीम जगभरात राबवली जाते. याच कल्पनेतून पाच वर्षांपूर्वी कोल्हापुरातील तरुणांच्या एका ग्रुपने या मोहिमेची कोल्हापुरात सुरुवात केली. दरवर्षी या तरुणांकडून जमा झालेली रक्कम ४ ते ५ कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येते. आत्तापर्यंत २० हुन अधिक कॅन्सरग्रस्त रुग्णांना आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिकची मदत करण्यात आली आहे. या मोहिमेला प्रतिसाद वाढतच असून अनेक रुग्णांना यामुळे आर्थिक मदत मिळाली आहे.
यंदा नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेतून जमा झालेल्या रक्कमेतून ८ ते ९ कॅन्सरग्रस्त कुटुंबांना औषधांची तसेच आर्थिक मदत करण्यात येणार आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी नो शेव्ह नोव्हेंबर मोहिमेत तरुणांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन दर्शन शहा, निलेश सुतार, ओंकार लडगे यांनी केले आहे.