

Nilewadi bridge water level
कासारवाडी : चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने वारणा नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे निलेवाडी ते ऐतवडे खुर्द दरम्यानचा पूल पाण्याखाली गेला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे.
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये रात्रीपासून अतिवृष्टी होत असून धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढवला आहे . सध्या धरणातून तब्बल १३,५३० क्यूसेक्सने पाणी सोडले जात असून, त्याचा परिणाम म्हणून निलेवाडी आणि ऐतवडे खुर्द जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद केला असून, नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत सतत पाण्याच्या पातळीवर नजर ठेवण्यात येत आहे.यामुळे शेतकऱ्यांसह स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, पूल जलमय झाल्याने दैनंदिन वाहतूक व संपर्कावर परिणाम झाला आहे.