

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यात आयटी पार्कची उभारणी आणि हद्दवाढ निर्णयासाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती उद्योग राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्याबाबत लक्षवेधी मांडली होती.
आ. क्षीरसागर म्हणाले, गेल्या 82 वर्षांत शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रासह इतर विकासासाठी जमीन उपलब्ध नाही. हद्दवाढ न झाल्याने शहरासह जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. लोकसंख्येअभावी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांतून विकासासाठी निधी मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हद्दवाढीचा प्रस्ताव देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहर परिसरातील आठ गावांच्या हद्दवाढीचा प्रस्ताव तयार केला जात आहे. ही गावे शहराशी एकरूप झाली आहेत. महापालिकेच्या वतीनेच या गावांना केएमटी, पाण्यासह इतर सुविधा पुरविण्यात येत आहेत. शहराला लागून ही गावे असल्याने शिक्षण, नोकरीसह इतर व्यवसायासाठी तेथील ग्रामस्थ कोल्हापुरातच असतात. त्यामुळे शहराची हद्दवाढ करावी.
दरम्यान, शहराच्या हद्दवाढीबाबत आ. क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना पत्र दिले. त्यानंतर प्रशासकांनी भौगोलिकद़ृष्ट्या शहराची एकरूप झालेल्या आठ गावांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना पत्र पाठविले. त्यानुसार जिल्हा परिषदेने महापालिकेला आठ गावांचा सविस्तर अहवाल पाठवला आहे.