Abuse case kolhapur | ध्यान साधनेच्या आड अत्याचार? शिरोळ तालुक्यातील प्रकार चर्चेत

बुवाच्या ध्यान मंदिरातील कथित गैरप्रकारांच्या चौकशीची ग्रामस्थांकडून मागणी...
Abuse case kolhapur | ध्यान साधनेच्या आड अत्याचार? शिरोळ तालुक्यातील प्रकार चर्चेत
Published on: 
Updated on: 

महादेव शहापुरे

कवठेगुलंद : राज्यात कॅप्टन खरात प्रकरण गाजत असतानाच शिरोळ तालुक्यातील एका ग्रामीण भागातील ध्यान साधनेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अत्याचारांच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्याच्या दक्षिण भागातील एका एकांत ठिकाणी स्वयंघोषित बुवाकडून ध्यान साधना घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गावापासून दूर, स्वतःच्या मळा परिसरात या बुवाने भव्य आणि अलिशान ध्यान मंदिर उभारले आहे. येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातून महागड्या वाहनांतून मोठ्या संख्येने भक्त येत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, या भक्तांमध्ये महिला व महाविद्यालयीन युवतींचा मोठा सहभाग असल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येते. ध्यान साधनेमुळे मन एकाग्र होते, असे सांगत बुवाने भक्तांसाठी आलिशान निवासव्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे.

दरम्यान, सुमारे सहा महिन्यांपूर्वी एका उच्चशिक्षित युवतीने ध्यान मंदिरात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पालकांकडे केली होती. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंदिरात जाऊन संबंधित बुवाला बेदम मारहाण केली होती. तसेच, मंदिरातील मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित केल्याची माहितीही स्थानिकांनी दिली होती. या घटनेनंतर काही काळ बुवा फरार झाला होता आणि मंदिरही बंद होते.

आता पुन्हा बुवाचे आगमन झाल्याने मंदिरात भक्तांची वर्दळ वाढू लागली आहे. दरम्यान, खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या ध्यान मंदिरातील कथित प्रकार पुन्हा चर्चेत आले असून, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news