

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य वितरण व्यवस्थापक महेश मधुकर डाकरे (वय ५०, मूळ रा. शिवाजी पेठ, सध्या रा. ओयासिस अपार्टमेंट, जरगरनगर रोड, कोल्हापूर) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
अस्वस्थ वाटू लागल्याने शनिवारी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. महेश डाकरे गेल्या काही महिन्यांपासून दैनिक ‘पुढारी’मध्ये मुख्य वितरण व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी दै. सकाळ (कोल्हापूर आणि पुणे) येथे वितरण व्यवस्थापक म्हणून काम केले आहे.
शालेय जीवनापासूनच ते उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून परिचित होते. त्यांनी जय भवानी संघ आणि गोल्ड स्टार संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती. काही काळ त्यांनी फुटबॉल प्रशिक्षक म्हणूनही काम केले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २२) सकाळी १० वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे होणार आहे.