डॉ. ग. गो. जाधव अध्यासन पत्रकारितेचे स्फूर्तिस्थान : दीपक केसरकर

डॉ. ग. गो. जाधव अध्यासन पत्रकारितेचे स्फूर्तिस्थान : दीपक केसरकर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. विविध प्रकल्पांना गती दिली. शिवाजी विद्यापीठात देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन साकारले. पद्मश्री डॉ.ग.गो.जाधव यांच्या नावाने उभारलेले हे अध्यासन पत्रकारितेचे स्फूर्तिस्थान राहील, असा विश्वास शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे मावळते पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करता आले, हे माझे भाग्यच असून, जिल्ह्याच्या विकासासाठी यापुढेही प्रयत्न करत राहू, असे भावनिक उद्गार काढत निसर्गसंपन्न कोल्हापूर जिल्हा भविष्यात राज्यासह देशातील अग्रगण्य जिल्हा ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी पालकमंत्री केसरकर यांनी आज कोल्हापूरला भेट दिली. खासदार, आमदार व जिल्ह्यातील विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात त्यांनी संवाद साधला. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोल्हापुरी फेटा आणि श्री अंबाबाईची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कोल्हापूरला पत्रकारितेचा इतिहास आहे, असे सांगत केसरकर म्हणाले, पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पद्मश्री डॉ. ग.गो.जाधव अध्यासन केंद्र उभारण्यात आले आहे. त्याचा पत्रकारांसह माध्यम क्षेत्राला मोठा फायदा होईल. मधाचे गाव पाटगावचा देशपातळीवर गौरव होणे अभिमानास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरइतके प्रेमळ लोक कुठेही भेटणार नाहीत, असे सांगत कमी वेळात कोल्हापूरचे लोक उकृष्ट काम करू शकतात, हे दसरा महोत्सवावेळी दिसून आले. जिल्ह्यातील गड, किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. पंचगंगा प्रदूषणमुक्ती, रस्ता काँक्रिटीकरण, तालमींना निधी, रंकाळा सुशोभीकरण, पंचगंगा घाट व शिवाजी पुलावरील विकासकामे सुरू आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळ कोल्हापूर जिल्हा असून त्याद़ृष्टीने जिल्ह्याचा विकास साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूरवर आपले लक्ष असेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार पी.एन.पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते. यानंतर त्यांनी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचा विजय म्हणजे स्वत:चा विजय असे समजून कामाला लागा, असा सल्लाही त्यांनी दिला.

केसरकर भावनिक

अनेक जिल्ह्यांचा पालकमंत्री म्हणून काम केले. मात्र, कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून काम करताना सुख आणि समाधान मिळाल्याची भावना व्यक्त करताना केसरकर भावनिक झाले होते. कोल्हापूरच्या विकासासाठी सुरू झालेले सर्व प्रकल्प यापुढेही सुरू राहतील, अशी ग्वाही नूतन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news