सरवडे : पुढारी वृत्तसेवा – नरतवडे (ता. राधानगरी) येथील ग्रामदैवत केदारलिंग यात्रेनिमित्त जीवन शिक्षण विद्या मंदिराच्या पटांगणात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत न्यू मोतिबागचा अजित पाटील याने हरियाणाच्या अमितकुमारवर छडीटांग डावावर मात करत प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत किरण पाटील (इस्पूर्ली) याने मथूरेच्या धर्मावर घिस्सा डावावर तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ऋषीकेश पाटील (बानगे) याने आकडी डावावर ओंकार पाटील (मोतीबाग) याच्यावर मात केली तर चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पार्थ कळंत्रे (बाचणी) याने पोकळ घिस्सा डावावर भगवान जाधव (न्यू मोतिबाग) याला चितपट केले. एकमेव झालेल्या महिला लढतीत सिध्दी तानाजी सावंत (नरतवडे) हिने स्वागता चौगले (कणेरी) हिच्यावर लपेट डावाने मात केली.
कुस्ती मैदानात लहानमोठ्या तीसहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या अन्य विजयी मल्ल असे सुरज बंडोपंत गुरव (नरतवडे), सौरभ केकान (शाहूपुरी), ओंकार पाटील (राशिवडे), सनी कुसाळे (निगवे), माणिक भांदिगरे (वाळवे), महेश पाटील (तिटवे), प्रथमेश आबदार (तिटवे), गणेश पाटील (वाळवे), तेजस लोहार (राशिवडे), राजा महाडेश्वर (निगवे), आदित्य देसाई (निळपण), निशांत पाटील (राशिवडे), अभिजित यादव (अर्जुनवाडा), आदित्य गिरीगोसावी (सरवडे), आदित्य संकपाळ (वाळवे), सिद्धार्थ मगदूम (चुये), समरजित पाटील (मांगेवाडी), हर्षवर्धन जाधव (सरवडे), साईराज गोनुगडे (राशिवडे) असे आहेत.
संपूर्ण कुस्तीचे कृष्णात चौगले राशिवडे यांनी निवेदन केले. पंच म्हणून उपमहाराष्ट्र विजेते श्रीधर रेपे, रामदास लोहार, विलास टिपूगडे, सागर पाटील यांनी काम पाहिले. यावेळी यात्रा कमिटीचे सदाशिव एरुडकर, तानाजी गुरव, सदाशिव सावंत, शिवाजी कदम, महादेव पाटील, बळीराम पाटील, दत्तात्रय शेटके, साताप्पा कांबळे, यशवंत गुरव, जयसिंग शिंदे, प्रथमेश गुरव, आनंदा सावंत, कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.