

Unknown vehicle hits migrant woman
शिरोली एमआयडीसी : पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव येथील कोल्हापूर स्टील कंपनीसमोर मध्यरात्री एक वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेने गंभीररीत्या जखमी झालेल्या पादचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत महिला ही परप्रांतीय उत्तरप्रदेशची होती.
शिरोली पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कुशबू संदीप प्रजापती ( वय २२) रा. उत्तरप्रदेश सध्या शिरोली पुलाची ता. हातकणंगले ) असे आहे . ही महिला आपल्या कुटुंबासह शिरोली येथे आठ महिन्यापूर्वी राहण्यास आली होती.
पती संदिप हा शिरोली औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करत असून तो शनिवारी रात्री कामावरून घरी आल्यावर दोघांनी एकत्र जेवण करून झोपी गेले होते.
रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास कुशबू ही लघूशंकेला जातो असे सांगून घराबाहेर पडली पण ती घरी आली नसल्याने पती संदिप व त्याच्या भावाने परिसरात तीचा शोध घेतला असता ती सापडली नाही . पण कुशबू ही राहत असलेल्या घरापासून २ किलोमीटर लांब असणाऱ्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आली असता ती रस्ता ओलांडत असताना बेंगलोरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने तिला जोरात धडक दिली .
गाडीची चाके तीच्या दोन्ही पायावरून गेल्याने तीचे पाय जागेवरच निकामी झाले होते. तीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे .