

Kolhapur Municipal Corporation Election
कोल्हापूर : राज्यात आज (दि. १५) महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान झाले. मात्र मतदार यादीमधील घोळ झाल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच आता कोल्हापुरात एक आगळा-वेगळा प्रकार समोर आलाय. तरुणी पुण्यात असूनही तिच्या नावाने मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १५ मधील मोमीन परिवारामधील सना मोमीन या सध्या पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास असतात. त्या पुण्यात असूनसुद्धा त्यांच्या नावाने मतदान आधीच झाल्याची माहिती कुटुंबातील सदस्यांना मिळाली. या संदर्भात कक्षातील संबंधित कर्मचाऱ्यांना सना यांच्या कुटुंबीयांनी जाब विचारला. हे मतदान कसं झालं, अशी विचारणाही केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचं मोमीन कुटुंबीयांनी सांगितले.
'पुढारी न्यूज'शी बोलताना सना मोमीन यांच्या बहिणीने म्हटलं की, आज सकाळी मी आई आणि आजीबरोबर मतदानासाठी आले होते. आम्ही मतदार रांगेत उभे राहिलो. मतदान केंद्रावर आत गेल्यानंतर माझ्या भावाचं आणि बहिणीचं एकत्रच नाव आहे. माझ्या नावाच्या शेजारी भावाचं नाव आणि बहिणीचं नाव होते. मात्र बहिणीच्या नावावर मतदान केल्याची खूण होती. याबाबत विचारणा केली. बहिण पुण्यात आहे. ती मतदानासाठी येणार आहे, असे सांगितले. संबंधितांना यादी दाखविण्यास सांगितले. यावेळी दोन्ही याद्यांवर मतदान गेल्याची खूण होती. तसेच मतदान केल्याची सहीही कर्मचाऱ्यांनी दाखवली. यावेळी त्यांना चुकीच्या व्यक्तीचे मतदान कसे घेतले, याबाबत विचारणा केली. याबाबत गेली दोन तास मी गर्भवती असताना विचारणा करत आहे. मात्र कोणीच दखल घेतली नाही, अशी व्यथाही त्यांनी मांडली.
सना मोमीन यांनी फोनवरून सांगितले की, आपण अजूनही पुण्यात आहोत. मतदानासाठी निघण्यापूर्वी माझ्या नावाने दुसऱ्या कोणीतरी मतदान केल्याची माहिती मला माझ्या बहिणीने आणि आईने दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी. अशी नजरचुकीने चूक झाली म्हणून यावर पडदा टाकू नये, अशी मागणीही मोमीन कुटुंबीयांनी केली आहे.