

कोल्हापूर : दहा वर्षांनंतर होत असलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत शहरातील काही प्रभाग अत्यंत चुरशीचे, संवेदनशील, स्फोटक आणि नेत्यांच्या प्रतिष्ठेचे बनले असल्यामुळे या प्रभागातील लढती हाय व्होल्टेज बनल्या आहेत. शहरातील हे हाय व्होल्टेज प्रभाग चर्चेचे बनले असून या प्रभागातील लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील राजकीय चित्र पाहता महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होईल, अशी अपेक्षा होती; मात्र जागावाटपाच्या चर्चेने आघाड्यांमध्ये बिघाडी होण्यास सुरुवात झाली. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आघाडीतून बाहेर पडत आप, वंचित बहुजन आघाडी यासारख्या पक्षांना सोबत घेऊन स्वतंत्र शाहू आघाडी स्थापन झाली. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीतही अस्वस्थता उफाळून आली. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला जागावाटपात महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी साधी विचारणाही न केल्यामुळे नाराजीचा उद्रेक झाला. अखेर जनसुराज्य पक्षाने आरपीआयला सोबत घेत चौथी आघाडी उभारल्याने महापालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात अधिकच रंगत आली. यामध्ये काही प्रभागांतील लढती हाय व्होल्टेज बनल्या आहेत.
प्रभाग 1 व 2 मध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत आहे. प्रभाग 3 मध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. प्रभाग 4 मधील लढत ही अस्तित्वाची लढत आहे. विधानसभा निवडणूक लढविलेले राजेश लाटकर पुन्हा काँग्रेसकडून महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी नगरसेवक संजय निकम आहेत. प्रभाग 6 मध्ये माधवी गवंडी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात माजी नगरसेविका काँग्रेसच्या तेजस्विनी घोरपडे रिंगणात आहेत. याशिवाय माजी नगरसेवक नंदकुमार मोरे व माजी नगरसेवक प्रताप जाधव यांच्यातील लढत काटाजोड आहे. प्रभाग 7 कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रभागातून शिवसेना शिंदे गटाकडून ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात माजी नगरसेवक विजय साळोखे-सरदार अपक्ष म्हणून मैदानात उतरले असून त्यांनी आव्हान निर्माण केल्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज बनला आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराने हवा केल्यामुळे प्रभाग क्रमांक 10 शेवटच्या टप्प्यात चांगलाच चर्चेत आला आहे. या प्रभागातून काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटातून अजय इंगवले आहेत. माजी नगरसेविका रूपाराणी निकम (भाजप) यांच्या विरोधात माजी उपमहापौर भूपाल शेटे (काँग्रेस) यांच्यात लढत होत आहे.
शाहू आघाडी - जनसुराज्यचा फटका कोणाला?
शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी), आप आणि वंचित बहुजन आघाडी यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली. जनसुराज्य शक्ती व आरपीआयने एकत्र येत आपली आघाडी जाहीर केली. या आघाड्यांचा फटका कोणाला बसणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
चौरंगी लढतीने वाढली रंगत
महाविकास आघाडी - महायुतीमध्ये जागावाटपावरून निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. शरद पवार गटाची शाहू आघाडी आणि जनसुराज्य-आरपीआय युतीने मैदानात उतरवलेल्या चौथ्या आघाडीमुळे बहुतांश प्रभागांमध्ये मतांचे विभाजन अटळ असून चुरस कमालीची वाढली आहे.
देशमुख, आजरेकर यांच्या अस्तित्वाची लढाई
प्रभाग 9 मध्ये आ. सतेज पाटील यांचे एकेकाळचे विश्वासू सहकारी शारंगधर देशमुख धनुष्यबाण घेऊन रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँगे्रसचे राहुल माने तर प्रभाग 12 मध्ये अश्किन आजरेकर यांच्या विरोधात रियाज सुभेदार लढा देत आहेत. त्यामुळे देशमुख व आजरेकर यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
नात्यागोत्यातील संघर्ष आणि पारंपरिक लढत
प्रभाग 8 मध्ये काँग्रेसचे इंद्रजित बोंद्रे आणि शिवसेनेचे शिवतेज खराडे या आत्येभावांमधील लढत चर्चेत आहे. तर
प्रभाग 14 मध्ये प्रकाश नाईकवरे आणि अमर समर्थ यांच्यातील पारंपरिक राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळत असून, या लढतीचीही शहरात चर्चा सुरु आहे.