कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी मंगळवारी अखेरच्या दिवशी उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ‘महा’झुंबड उडाली होती. अवघ्या चार तासांत 613 अर्ज दाखल झाले. महापालिका निवडणुकीसाठी एकूण 813 अर्ज दाखल झाले. काहींना अखेरच्या क्षणी वेळ संपल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही.
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारीसाठी गेल्या काही दिवसांपासून इच्छुकांची धावपळ सुरू होती. सात निवडणूक निर्णय कार्यालयातून तब्बल 2 हजार 353 अर्जांची विक्री झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्यास दि. 23 डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. मात्र, दि.27 पर्यंत केवळ 29 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. सोमवार, दि. 29 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गर्दी झाली होती. मंगळवारी उमेदवारी दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. या दिवशी अर्ज दाखल करण्यास मात्र महाझुंबड उडाली.
महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, जनसुराज्य-रिपब्लिकन पार्टी युती यांच्या उमेदवारांनी सकाळपासून निवडणूक कार्यालयांसमोर गर्दी केली होती. महायुतीच्या दुधाळी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरणार्या उमेदवारांनी नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. हलगीच्या कडकडाटासह गळ्यात अडकवलेले पक्षाचे स्कार्फ, डोक्याला टोप्या, हातात ध्वज, उमेदवारांचा जयघोष, पक्षांच्या विजयाच्या घोषणा देत रॅलीने तसेच गटागटाने उमेदवार कार्यालयाकडे येत होते. यामुळे निवडणूक कार्यालयाकडे येणार्या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. उमेदवारांसह ठरावीक जणांचा आत प्रवेश देताना पोलिसांची दमछाक होत होती. काही ठिकाणी आत सोडण्यावरून किरकोळ वादावादीही झाली. कार्यालयात गेल्यानंतर अनामत रक्कम भरून घेतली जात होती. त्यानंतर अर्जांची पडताळणी करून कागदपत्रे तपासली जात होती. त्यानंतर उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला जात होता. या सर्व प्रक्रियेला काहीसा वेळ लागत होता. यामुळे कार्यालयात उमेदवारांचीही गर्दी होत होती. काही ठिकाणी अर्ज सादर करण्यास दुपारी रांगही लागली होती.
दुपारी तीन वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याने अनेकांची वेळेत अर्ज सादर करण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू होती. प्रत्येक उमेदवारांचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत होते. वेळ संपत येताच कार्यालयात उपस्थित उमेदवारांचे चित्रीकरण करून त्यांना टोकन देण्यात आले. दुपारी तीन नंतर कार्यालयाचे दरवाजे, खिडक्या बंद करून टोकननुसार कार्यालयात उपस्थित उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर वेळेत न आलेल्या दोन उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवारांसह समर्थकांच्या उत्साहाला उधाण येत होते. विजयाच्या घोषणा देत अनेकजण प्रभागाकडे मार्गस्थ होत होते. यामुळे सायंकाळपर्यंत निवडणूक कार्यालयांचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी चार तासांत 613 अर्ज दाखल झाले. दाखल अर्जांची बुधवारी सकाळी 11 वाजता छाननी होणार आहे. या छाननीकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
विक्रमी अर्ज...
पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीसाठी इच्छुकांची प्रचंड झुंबड उडाली. शेवटच्या दिवशी अवघ्या 4 तासांत 613 अर्ज दाखल झाले, तर एकूण अर्जांची संख्या 813 वर पोहोचली आहे.
दणाणले कोल्हापूर
महायुती, महाविकास आघाडी आणि इतर आघाड्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पक्षाचे स्कार्फ, ध्वज आणि हलगीच्या कडकडाटात निघालेल्या रॅलींमुळे शहरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
वेळेची कसोटी अन् पोलिसांची दमछाक
दुपारी 3 ची वेळ संपत आल्याने उमेदवारांची धावपळ उडाली. गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांची कसरत झाली, तर वेळेनंतर आलेल्या काही उमेदवारांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
आता लक्ष छाननीकडे
अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, बुधवारी सकाळी 11 वाजता अर्जांची छाननी होणार आहे. तांत्रिक कारणास्तव कोणाचा अर्ज बाद होणार की सर्वजण रिंगणात राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.