कोल्हापूर; सतीश सरीकर : कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीने गेली दहा वर्षे काँग्रेसला हात दिला. त्याचा परिणाम काँग्रेस बळकट होत गेली. महापालिकेतील सत्तेने काँग्रेसला जिल्ह्यात यश मिळवून दिले. त्याला राष्ट्रवादीची खरी साथ होती. मात्र, आता राष्ट्रवादीतच उभी फूट पडली असून सर्व लोकप्रतिनिधी अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्याचा महापालिकेच्या राजकारणावर परिणाम होणार असून समीकरणे बदलणार आहेत. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासह ताराराणी आघाडी पक्ष एकत्र झाले आहेत. साहजिकच काँग्रेस पक्ष एकाकी पडला असून त्यांना सर्वपक्षीयांचे आव्हान असेल. महापालिका निवडणुकीचे रणांगणही अशाच रणनीतीने गाजेल. विधानसभेची पायरी चढायची असेल तर त्यासाठी महापालिकेची सत्ता ताब्यात असायला हवी. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणून मनपावर झेंडा फडकविण्यासाठी सर्व पक्ष शर्थीचे प्रयत्न करतील.
2010 सालापासून महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ हे एकत्र आहेत. निवडणुकीच्या मैदानात ते स्वतंत्रपणे उतरत असले तरी निकालानंतर त्यांच्यात आघाडी होते. आता मात्र मंत्री मुश्रीफ यांनीच राष्ट्रवादीत बंड केले आहे. साहजिकच कोल्हापूर शहर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. महापालिकेत सर्वच नगरसेवक मंत्री मुश्रीफ यांच्या बाजूने गेले आहेत. सद्य:स्थिती पाहता महापालिकेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत राष्ट्रवादीतील अजित पवार गट असेल. त्यानुसार मुश्रीफ हे महायुतीत सहभागी होतील. म्हणजेच शिवसेना शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खा. धनंजय महाडिक यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री मुश्रीफ यांचा सलोखा राहील. परिणामी काँग्रेसला मित्रपक्ष राष्ट्रवादीशिवाय महापालिकेच्या सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागणार आहे. कारण सद्य:स्थितीत काँग्रेस वीक तर विरोधक स्ट्राँग अशी स्थिती आहे.
काँग्रेस : आ. सतेज पाटील यांच्या खांद्यावरच जिल्हा काँग्रेसची धुरा आहे. महापालिकेच्या 2015-20 या पंचवार्षिक सभागृहात 81 पैकी काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे 30 नगरसेवक होते. 2019 नंतर आ. पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. कोल्हापूर उत्तरबरोबरच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अनुक्रमे जयश्री जाधव व ऋतुराज पाटील हे काँग्रेसचे आमदार आहेत. भाजप व ताराराणी आघाडीचे काही माजी नगरसेवक काँग्रेससोबत आले आहेत. आमदारांसोबतच शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख हे शिलेदार असतील.
भाजप : खा. महाडिक यांच्यावरच भाजपची मदार आहे. त्यांच्यासोबत ताराराणी आघाडी पक्षाचे पाठबळ असेल. गेल्या सभागृहात ताराराणी आघाडीचे 19 व भाजपचे 14 नगरसेवक होते. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आणखी नगरसेवक निवडून आले असते तर भाजपचा झेंडा महापालिकेवर फडकला असता. गेली अनेक वर्षे ताराराणी आघाडीची महापालिकेवर सत्ता होती. त्यामुळे शहरात ज्याठिकाणी भाजपचा प्रबळ उमेदवार नसेल त्याठिकाणी ताराराणी आघाडीचा उमेदवार मैदानात असेल. खा. महाडिक यांच्यासोबत माजी आ. अमल महाडीक, सत्यजित कदम, भाजपचे शहराध्यक्ष राहूल चिकोडे यांची साथ असेल.
शिवसेना शिंदे गट : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे शिवसेना शिंदे गटाचे नेतृत्व आहे. गेल्या सभागृहात शिवसेनेचे 4 नगरसेवक होते. शिवसेनेत दोन गट असले तरी बहुतांश लोकप्रतिनिधी, पदाधिकारी क्षीरसागर यांच्या बाजूने आहेत. क्षीरसागर यांनी शहरातील रस्त्यासाठी 100 कोटींचा निधी, कन्व्हेंशन सेंटरसाठी 100 कोटींचा निधी आणून निवडणुकीसाठी बांधणी सुरू केली आहे. खा. संजय मंडलिक यांच्यासह युवा सेना अध्यक्ष ऋतुराज क्षीरसागर, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण आदींची साथ असेल.
राष्ट्रवादी अजित पवार गट : मुश्रीफ हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले आहेत. मात्र, पारंपरिक मित्र काँग्रेसपासून ते दुरावले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट महापालिका निवडणुकीत स्वतंत्र उतरणार की महायुतीमध्ये सहभागी होणार हे लवकरच स्पष्ट होईल. कारण 2010 पासून काँग्रेससोबत मनपाच्या सत्तेत असूनही मंत्री मुश्रीफ यांचा भर महापालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे रणांगणात उतरण्यावर होता. राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची संख्या जास्त आहे. राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
शिवसेना ठाकरे गट : जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यावरच शिवसेना ठाकरे गटाची भिस्त आहे. त्यांच्याशिवाय अन्य पदाधिकारीही आहेत. परंतु ठाकरे गटाची ताकद सद्य:स्थितीत अत्यल्प आहे. उमेदवार शोधण्यापासून त्यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. पक्षाचे काही पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यावरच या गटाचे यश अवलंबून आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गट : शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल. परंतु राष्ट्रवादीचे बहुतांश माजी नगरसेवक मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आहेत. त्यात पोवार यांचा पुतण्या व माजी स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे या पक्षालाही तुल्यबळ उमेदवार मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे. अन्यथा माजी नगरसेवकांना निवडणूक रिंगणात उतरावे लागेल.
काँग्रेस – 30, राष्ट्रवादी – 14
ताराराणी आघाडी – 19,
भाजप – 14, शिवसेना – 4
महापालिकेच्या राजकारणात काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ गेल्या पंधरा वर्षांपासून एकत्र आहेत. 2010-15 व 2015-20 या दोन्ही पंचवार्षिक सभागृहात त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडीची महापालिकेत सत्ता होती. महापालिकेतील सत्तेमुळेच ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळमध्येही एकत्र आले. परंतु आता सत्तेचा सारीपाट बदलला आहे. मुश्रीफ हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेले आहेत. त्यामुळे आ. पाटील यांच्यापासून आता त्यांची फारकत असेल. आतापर्यंतचे विरोधक खा. धनंजय महाडिक यांच्याशी त्यांना जुळते घ्यावे लागणार आहे. त्यामुळे मंत्री मुश्रीफ, राजेश क्षीरसागर व खा. महाडिक हे एका बाजूला तर आ. पाटील एका बाजूला असतील. असाप्रकारे खास मित्र विरोधक म्हणून समोर असेल. तर यापूर्वीच्या विरोधकांचे गळ्यात गळे, असे राजकारण होईल.