कोल्हापूरकरांना यंदाही पाण्याचा वनवास?

कोल्हापूरकरांना यंदाही पाण्याचा वनवास?

कोल्हापूर :  कोल्हापूर महापालिका प्रशासनाने महापुराच्या काळात शहराच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येणार नाही, अशी कृती करणे आवश्यक होते. पण प्रत्यक्षात एक सबमर्सिबल पंप बसविण्याखेरीज कोणत्याही मूलभूत सुविधा केल्या गेल्या नाहीत. यामुळे यंदाही पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की, नागरिकांच्या पाण्याचा वनवास सुरू होणार आहे. यावर टँकरने पाणीपुरवठा सुरू होईल; पण कोल्हापूरची स्थिती सुधारणार केव्हा? हा प्रश्न नागरिकांनी विचारण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूरकरांनी गेल्या दोन दशकात 2005, 2009, 2019 आणि 2021 असा चारवेळेला महापुराशी सामना केला. पंचगंगेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काँक्रिटचे जंगल वाढण्याचा सपाटा सुरू असल्याने महापुराची ही आपत्ती पाचवीला पूजणार, अशी अवस्था निर्माण झाली आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रतिदिन सरासरी 140 दशलक्ष लिटर्स पाणी उपसा केला जातो. यापैकी बालिंगा उपसा सिंचन योजनेतून 50 एमएलडी पाणी उपसा केले जाते तर नागदेववाडी, शिंगणापूर आणि कळंबा येथून उर्वरित पाण्याचा उपसा होतो. पुराच्या पाण्यात पंचगंगेची पातळी समुद्रसपाटीपासून 548 मीटर अंतरावर जाते तेव्हा बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर ही उपसा केंद्रे पाण्याखाली जातात. शहराचा पाणी पुरवठा ठप्प होतो. शहरात टँकर फिरू लागतात आणि पाण्याचा भाव चांगलाच वधारतो. त्यातही पुराचे पाणी ओसरल्यानंतर पाण्याखाली गेलेली उपसा यंत्रणा हिटर्सच्या माध्यमातून गरम करून ती पूर्ववत करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी जातो. याला कोल्हापूरकरांचा नवा वनवास म्हटले जाते. या परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्ध आहे. निधीची सबबही सांगता येत नाही; पण प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी इच्छाशक्तीच गमावल्यामुळे हा बाका प्रसंग येऊन ठेपतो.

गेल्या 20 वर्षांत एकमेव बदल झाला, तो म्हणजे बालिंगा उपसा केंद्रावर सबमर्सिबल पंप बसविला. त्या पंपाच्या वर्कऑर्डरची फाईलही आठ महिने दाबून ठेवल्याने गेल्या पावसाळ्यात वनवास होताच. आता हा पंप बसविल्यामुळे बालिंग्यातून 65 टक्केम्हणजे 30 एमएलडी पाण्याचा उपसा नियमित होईल; पण महापुरात नागदेववाडी, शिंगणापूर पाण्याखाली गेल्यानंतर काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे. शिंगणापूर योजना बंद पडल्याने शिंगणापूरकडून पुईखडी व कसबा बावड्याकडे जाणार्‍या पाण्याचा उपसा बंद होणार आहे. यामुळे शहराला केवळ बालिंग्यातील 30 व कळंबा तलावातील 8 असा एकूण 38 एमएलडी पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकतो. शहरातील सी व डी वॉर्डातील 30 मतदारसंघ वगळता अन्यत्र हा पुरवठा अशक्य आहे. यातील गळतीचे प्रमाण लक्षात घेतले, तर दैनंदिन पाणीपुरवठ्याच्या 15 टक्क्यांवर पाणी उपलब्ध होणार नाही. यापेक्षा प्रशासनाच्या गलथानपणाचा कोणता मोठा पुरावा हवा आहे?

मदतीसाठी सामाजिक संघटनांशी समन्वय

पुनर्वसनाच्या ठिकाणी नागरिकांसाठी नाष्टा, जेवण त्याचबरोबर जनावरांसाठी चारा यासाठी विविध सामाजिक संघटना, मदतीचा हात देणार्‍या व्यक्ती यांच्याशी समन्वय साधण्यात येत आहे. महापालिकेकडून आवश्यकता भासल्यास सेंट्रल किचनची सोय करून नागरिकांना सुविधा पुरवण्यात येणार आहेत. यासाठी मुख्य लेखापरीक्षक, पाणी पुरवठा व्यवस्थापनासाठी कार्यकारी अभियंता यांची जबाबदारी निश्चित केली आहे. सेंट्रल किचन तसेच जनावरांचा चारा याचीही मदत उपलब्ध होणार असल्यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news