जनतेचा ‘पांडुरंग’ अनंतात विलीन!

जनतेचा ‘पांडुरंग’ अनंतात विलीन!

[author title="राजेंद्र जोशी" image="http://"][/author]

कोल्हापूर : आ. पी. एन. पाटील यांनी सर्वसामान्य जनेतेच्या सुख-दुःखासाठी आपली अवघी हयात खर्ची घातली. गुरुवारी पहाटे कोल्हापूरच्या पश्चिमेकडील जनतेच्या या 'पांडुरंगा'ने अनंतात विलीन होणे पसंत केले आणि त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी कार्यकर्त्यांची एक पिढी शोकसागरात बुडून गेली. त्यांचे निधन कोल्हापूरकरांसाठीच नव्हे, तर जीवनातील वाईट टप्प्यांवर उभ्या राहिलेल्या काँग्रेस पक्षासाठीही कधीही भरून न येणारी हानी आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात स्वच्छ, पक्षाशी एकनिष्ठ, ढपले संस्कृतीपासून दूर व कार्यकर्त्यांसाठी सदैव तत्पर अशा नेत्यांची संख्या मोजकीच शिल्लक राहिली आहे. कोल्हापूरचे जिल्हा काँग्रेसचे नेते, आमदार पांडुरंग निवृत्ती तथा पी. एन. पाटील हे या मोजक्याच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. राज्यात काँग्रेस बहरली असताना पक्षाच्या एकनिष्ठतेच्या जोरावर त्यांनी थोड्या लांड्यालबाड्या केल्या असत्या, तर एव्हाना ते केव्हाच कॅबिनेट मंत्री होऊन पुढे गेले असते; पण कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करायचा नाही, पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानायचा आणि पक्षाने स्वतःहून दिलेले पदाचे दान आपल्या पदरात घ्यायचे, असा पी. एन. पाटील यांचा पिंड होता. 1995 मध्ये सांगरूळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून गेली 30 वर्षे ते मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी प्रामाणिक राहिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा या गावचे सुपुत्र असलेले पी. एन. पाटील हे रस्ते, धरण अशा मोठ्या प्रकल्पांना यंत्रसामग्री पुरविणारे कंत्राटदार. तसा त्यांचा राजकारणातील प्रवेश अपघातानेच झाला. काँग्रेसचे मुरब्बी नेते श्रीपतराव बोंद्रे यांचे जावई असलेल्या पी. एन. पाटील यांच्याकडे 1995 मध्ये सांगरूळ मतदारसंघातील उमेदवारी चालून आली. शेतकरी कामगार पक्षाचे तुल्यबळ प्राबल्य असलेल्या या मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले; पण जनसेवेचे व्रत घेतलेला हा पांडुरंग कधी डगमगला नाही व पाठोपाठ दुसर्‍या पराभवानेही तो खचला नाही.

काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसची बांधणी केली. यामुळेच आज कोल्हापुरात काँग्रेस जिवंत दिसते आहे. 2004 च्या निवडणुकीत पुन्हा जोमाने उभारलेल्या पी. एन. पाटील यांनी मात्र विजयश्री हस्तगत केली आणि पुन्हा सलग दोन निसटत्या पराभवानंतर 2019 च्या निवडणुकीत राजकारणावर मांड टाकून ते पुन्हा उभे राहिले. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या निवडणुकीपासून त्यांनी ना कधी राजकीय वारसा सांगितला, ना पदासाठी काँग्रेस श्रेष्ठींच्या पायात घुटमळणे पसंत केले.

अलीकडच्या काळात काँग्रेसच्या जीवावर मोठे झालेले अनेक दिग्गज पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सत्तेच्या प्रवाहात सहभागी झाले; पण कोल्हापूरच्या पांडुरंगाने काँग्रेसचा झेंडा कधी खाली ठेवला नाही. पक्षाला चांगला काळ असो वा वाईट काळ असो, पी. एन. सदैव पक्षाबरोबर राहिले. राखेतून फिनिक्स उडावा, अशारीतीने त्यांनी काँग्रेसच्या शिल्लक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुन्हा बांधणी केली. यामुळेच पी. एन. पाटील यांचा भावी पिढीसमोर निष्ठेचा वस्तुपाठ म्हणून उल्लेख केला, तर तो खोडून काढता येणे कठीण आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या राजकारणाने एक खंदा नेता गमावला असला, तरी करवीरच्या जनतेचा पांडुरंग अनंतात विलीन झाला.

मनाच्या श्रीमंतीला प्राधान्य

कोणताही आक्रस्ताळेपणा नाही, कधीही वादाच्या भोवर्‍यामध्ये अडकणे नाही, अशा या मितभाषी, पण शब्दाशी प्रामाणिक असलेल्या पी. एन. पाटील यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांसाठी किती कष्ट उपसावेत? फुलेवाडीच्या रिंगरोडवर पी. एन. पाटील यांचे गॅरेज होते. या गॅरेजवर सतत कार्यकर्त्यांची मोठी लगबग असायची. प्रत्येक कामात स्वतः लक्ष घालून ते पूर्ण होईपर्यंत त्यांचा कटाक्ष होता. कोरोना काळात तर अनेक नेते विजनवासात गेले असताना हा माणूस झोपतो की नाही, अशा झपाटलेपणातून मतदारसंघातील गोरगरिबांचे जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करीत होता.

प्रत्येक रुग्णाला वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, यासाठी त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते बाजीराव कांबळे यांना पहाटे पाच वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत त्यांचे दररोज शेकडो फोन खणखणत होते. कधी कामासाठी कोणा कार्यकर्त्याकडून पैची अपेक्षा केली नाही. सरकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या अर्थकारणात तर ते कधीच पडले नाहीत. मनात आणले असते, तर हा माणूस केवळ मैत्रीच्या जोरावर अब्जाधीश झाला असता; पण मुळातच गर्भश्रीमंत असलेल्या माणसाने मनाच्या श्रीमंतीला प्राधान्य दिले. यामुळेच करवीरच्या पंचक्रोशीने गुरुवारी कार्यकर्त्यांचा आक्रोश अनुभवला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news