इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा 27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज बिलात सुरू असलेली सवलत यापुढेही कायम राहील. कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, असे ठोस आश्वासन वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिले. त्याचबरोबर यासाठी सुरू केलेली ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुलभ तर करूच, पण 75 पैशांच्या सवलत योजनेचा एक महिन्याच्या आत निर्णय करू, असेही सांगितले. इचलकरंजीतील संवाद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. ना. शेख म्हणाले, कोरोनाच्या संकटातही राज्य शासनाने अनुदानावर 2200 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे कोणत्याही अनुदानाच्या योजना बंद होणार नाहीत. वस्त्रोद्योग धोरण ठरवताना सर्व घटकांचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांच्या समस्या, सूचना यांचा विचार करून अधिकार्यांशी चर्चा करूनच वस्त्रोद्योगाचे नवीन धोरण ठरवण्यात येणार आहे. (KOLHAPUR)
जिल्ह्यातील एकाही यंत्रमागाचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही, असे ठाम आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. ते म्हणाले, शासनाला लोकहिताचा विचार करताना नियमांचाही विचार करावा लागतो. वस्त्रोद्योगाचा विस्तार आणि वस्त्रोद्योगाला बळ देण्यासाठी मंत्री शेख प्रयत्न करीत आहेत.खासदार धैर्यशील माने म्हणाले, उद्योजकांनी ऑनलाईन माहिती देणे गरजेचे आहे. सध्या महावितरण आणि यंत्रमागधारक यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत वीज दर सवलत पूर्ववत करावी.
आ. प्रकाश आवाडे म्हणाले, महायुतीच्या सरकारच्या काळात तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर समितीने केलेल्या शिफारसी जशाच्या तशा पुढे सुरू ठेवाव्यात. केंद्र सरकारने सात मेगा प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत; मात्र यातील एकही पार्कसाठी महाराष्ट्र सरकारने मागणी केली नाही. व्याजदरातील 5 टक्के अनुदानाची 2300 प्रकरणे मंत्रालयात प्रलंबित आहेत. त्यावर तातडीने निर्णय व्हावा. आ. राजूबाबा आवळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, सतीश कोष्टी, यंत्रमागधारक राजगोंड पाटील यांची भाषणे झाली. राहुल खंजिरे यांनी प्रास्ताविक केले. शशांक बावचकर यांनी स्वागत व आभार मानले. यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, महादेव कांबळे, संजय कांबळे, यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक जाधव, सागर चाळके, नितीन जांभळे आदींसह यंत्रमागधारक उपस्थित होते.(KOLHAPUR)
यंत्रमागधारकांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. 2023 चे वस्त्रोद्योग धोरण ठरवण्यासाठी या समितीच्या शिफारसी महत्त्वाच्या आहेत. इचलकरंजीतील वस्त्रोद्योगातील दोन तज्ज्ञांचा समावेश या समितीत करणार असल्याची घोषणा मंत्री शेख यांनी मेळाव्यात केली. (KOLHAPUR)
आमदार आवाडे यांनी शाहू मिलच्या जागेवरील रखडलेल्या स्मारकाचा मुद्दा निदर्शनास आणून दिला. यावर मंत्री अस्लम शेख यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात हा निर्णय झालेला आहे. त्याची तातडीने आता पूर्तता करण्यासाठी बांधील आहे, असे सांगितले.(KOLHAPUR)
हेही वाचलतं का?