

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची सत्ता असताना जिल्ह्यात मात्र शिंदे गटाने बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आहे. त्यांना सत्ताधारी समर्थक जनसुराज्य शक्ती पक्षाने साथ दिली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली आहे.
जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट व जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या पहिल्या टप्प्यातील 18 पैकी 15 उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी जाहीर केली. या आघाडीत शिवसेना ठाकरे गटाचेही नेते असल्याचे आघाडीच्या वतीने सांगण्यात येत असले तरी त्याला शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हरकत घेतली आहे. व्यापारी व अडते गटातील उमेदवारीचा तिढा मात्र अद्याप कायम आहे. गुरुवारी या गटातील उमेदवार जाहीर करण्यात येणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी नेत्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. हसन मुश्रीफ, पी. एन. पाटील, विनय कोरे, सतेज पाटील, प्रकाश आबिटकर, संजय मंडलिक, के. पी. पाटील, संजय घाटगे, ए. वाय. पाटील, मानसिंगराव गायकवाड आदींचा चर्चेत समावेश होता. या नेत्यांनी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीची स्थापना केली. इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे आपल्याला अधिक जागा मिळावी यासाठी नेत्यांमध्येच तीव— स्पर्धा होती. नेतेमंडळी बुधवारी जिल्हा बँकेत एकत्र जमणार होते; परंतु काही जागांबाबत मतभेद असल्यामुळे त्यांनी जिल्हा बँकेतील चर्चेचे ठिकाण अन्यत्र हलविले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत या चर्चा सुरू होत्या. नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. अखेर 18 पैकी 15 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले.
राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही शेतकर्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. जाहीर झालेल्या उमेदवारांव्यतिरिक अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.