कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील छाननीमध्ये उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आलेल्या दहा संचालकांपैकी नंदकुमार वळंजू, दशरथ माने यांच्यासह 8 माजी संचालकांचे अर्ज वैध ठरले. तर दोन संचालकांचे अर्ज अवैध ठरले. याशिवाय तीन शेतकर्यांचे अर्ज वैध ठरले. एकूण 11 अर्ज वैध ठरले.
बाजार समितीचे 2 कोटी 71 लाख रुपये देणे लागत असल्याच्या कारणासह अन्य मुद्द्यांवरून 10 माजी संचालकांचे व सात-बारा उतारा न जोडणे, अर्जावर सही नसणे, चुकीच्या गटातील सुचक, अनुमोदक नोंद करणे अशा कारणास्तव 90 जणांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अपात्र ठरले आहेत. त्यापैकी 10 संचालक व शेतकरी अशा 17 जणांनी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडे अपील दाखल केले होते, त्याची दोन दिवसांपूर्वी सुनावणी झाली होती. त्याचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला.
त्यामध्ये माजी संचालकांनी जी रक्कम भरावी लागते, अपीलकर्त्यांचे म्हणणे होते. त्या रकमेबाबत कोणत्याही सक्षम प्राधिकार्यांचे किंवा न्यायालयाचे आदेश नाहीत, या कारणावरून 8 माजी संचालकांना पात्र ठरविण्यात आले आहे. तर दोन संचालकांनी वेळेत अपील दाखल केले नाही, त्यामुळे त्यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले.
अर्ज वैध ठरविण्यात आलेल्यांमध्ये नेताजी पाटील, उदय पाटील, शशिकांत आडनाईक, संजय जाधव, अमित कांबळे, बाबुराव खोत या माजी संचालकांचा समावेश आहे. तर अवैध अर्ज ठरलेल्या माजी संचालकांमध्ये उत्तम धुमाळ आणि सौ. संगीता पाटील यांचा समावेश आहे. तसेच शिवाजी गायकवाड, नामा धर्मा कांबळे, रणजित भास्कर या तिघा शेतकर्यांनी सुनावणीवेळी सात-बारा उतारे सादर केले. त्यामुळे त्यांचे अर्ज वैध ठरले.