

सुभाष पाटील
विशाळगड : मलकापूरच्या राजकारणात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या इनामदार कोकरे देसाई घराण्याने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत कोकरे देसाई घराण्यातील दीर आणि भावजय यांनी दणदणीत विजय मिळवत विजयाची परंपरा कायम राखली आहे. रविराज नानासो कोकरे देसाई यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली आहे, तर त्यांच्या वहिनी गिरीजा प्रतापसिंह कोकरे देसाई यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून विजय संपादन केला आहे. यामध्ये त्यांचे बंधू उदयसिंह कोकरे देसाई यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे.
रविराज कोकरे देसाई यांना राजकारणाचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. त्यांच्या मातोश्री शुभांगी नानासो कोकरे देसाई यांनी सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून काम केले असून त्यांनी नगराध्यक्षपदही भूषवले आहे. आईचा हाच जनसेवेचा वारसा आता रविराज कोकरे देसाई समर्थपणे पुढे नेत असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
इनामदार घराण्याने आपली संस्कृती आणि परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली आहे. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर 'निळे गावचे इनामदार' या नात्याने रविराज कोकरे देसाई यांनी सर्वप्रथम निळे गावचे ग्रामदैवत श्री जोतिबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. विजयाचा पहिला आनंद देवाच्या चरणी अर्पण करण्याची ही परंपरा आजही त्यांनी कायम राखली आहे, ज्याचे कौतुक परिसरात होत आहे.
रविराज कोकरे देसाई यांनी केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही आपली पकड मजबूत केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाहूवाडी तालुक्यातील निळे ग्रामपंचायत, विविध सहकारी संस्था आणि दूध संस्थांवर वर्चस्व राखले आहे. आता थेट नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून येत त्यांनी आपली वैयक्तिक लोकप्रियता आणि विकासकामांवरील लोकांचा विश्वास अधोरेखित केला आहे. या विजयामुळे मलकापूर आणि निळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.