

कोल्हापूर : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी येथील बहुचर्चित ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंटसह संलग्न कंपन्यांचे कोल्हापूर, इचलकरंजीसह हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरूंदवाड परिसरातील 17 एजंट पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. शनिवारी कर्नाटकातील एजंट महेश जयपाल घाडगे (वय 47, रा. सोनतळी, ता. करवीर, मूळ उगार खुर्द, ता. कागवाड, बेळगाव) यास स्थानिक गुन्हे अन्वेषणने जेरबंद केले.
संशयिताकडून 12 लाख 45 हजार रुपये किमतीची आलिशान मोटार हस्तगत करण्यात आली आहे. शिवाय बँक खाती गोठवून त्याच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यात येत असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. संशयित अथवा कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर लवकरच टाच आणण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. संशयिताला 14 जुलैपर्यंत पोलिस कोठडीचा आदेश झाला आहे.
ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंटसह संलग्न कंपन्यांच्या संचालकांसह एजंटांनी गुंतवणूकदारांना दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधीचा गंडा घातला आहे. याप्रकरणी मुख्य संशयितासह 39 संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी 21 जणांना अटक करण्यात आली आहे.
आणखी नव्याने 17 जणांची नावे निष्पन्न होत आहेत. त्यामध्ये बहुतांश एजंट म्हणून काम केलेल्या संशयितांचा समावेश आहे. संबंधितांनी कंपनीकडून मिळालेल्या कमिशन, परताव्यातून स्थावर मालमत्ता केल्याचेही निष्पन्न झाले आहे. संशयितांना लवकरच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी ए. एस. ट्रेडर्सप्रकरणी आर्थिक गुन्हे व स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून झालेल्या चौकशीचा आढावा घेतला. चौकशीत दोषी आढळणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत. गुंतवणूकदारांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरलेल्या एजंटाविरुद्ध कारवाईची विशेष मोहीम राबविण्याची त्यांनी सूचना केली आहे.