

कोल्हापूर : नागाळा पार्क, ताराबाई पार्क परिसरातील झालेल्या बिबट्याच्या थरारनाट्याची दिवसभर सोशल मीडियावर चर्चा होती. अखेर वन विभाग, अग्निशमन दलाच्या जवानांनी बिबट्यावर झडप घालून त्याला पकडल्यानंतर ‘नाद करायचा नाही, कोल्हापूरच्या धाडसाला सलाम’ अशा पोस्टस् तुफान व्हायरल होत होत्या. दरम्यान, काहींनी या घटनेला गमतीशीर वळणही दिले. ‘कमान अन् कवा पाडलायसा! मला काही कळालंच नाही, जंगलातून थेट कोल्हापुरात आलो!’ असे बिबट्या म्हणत असल्याची विनोदी पोस्टदेखील व्हायरल केली.
‘इथलं रस्ते बघितल्यावर वाटलं, हे जंगलातलंच रस्ते हायत. म्हणून मी इकडं आलो’, असे बिबट्या म्हणत असल्याच्या देखील गमतीशीर पोस्ट व्हायरल झाल्या. संपूर्ण घटनेदरम्यान सोशल मीडियावर ‘बिबट्या आता कुठे?’ हा प्रश्न ट्रेंडिंगवर आला होता. अनेकांनी वनविभागाच्या मोहिमेचे फोटो शेअर करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. काहींनी मात्र ‘थिलसाठी गर्दी टाळा’ अशी जबाबदार अपीलही केली. एकूणच बिबट्याचे थरारनाट्य यामुळे सोशल मीडियावर दिवसभर ‘बिबट्या फिव्हर’च ट्रेंडिगवर होता.