

Shiv Sena march Kurundwad land survey office
कुरुंदवाड : कुरुंदवाड शहरातील नगर भूमापन कार्यालयात गेल्या दीड वर्षांपासून फेरफार नोंदणी, प्रॉपर्टी कार्ड नोंदणी, डायरी नोंदी आणि भूमापन मंजुरीची कामे रखडल्याने गुरुवारी (दि.९) नागरिकांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती करत सोमवार पर्यंत सर्व अर्जांचा निपटारा न झाल्यास नगर भूमापन कार्यालयाला टाळे ठोकणार, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी दिला आहे.
मोर्चादरम्यान आलेल्या तक्रारींमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये गडबड उडाली. अधिकारी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत असताना नागरिकांनी ‘अर्जांची तारीख, मंजुरीचे निकष स्पष्ट असा ठाम आग्रह धरला. सोमवार पर्यंत सर्वांचा निपटारा करू, असे आश्वासन दिल्यानंतर नागरिक शांत झाले.
या मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी केले. त्यांनी गट क्रमांक 1249 मधील सहा प्लॉटधारकांनी डायरी मंजुरीसाठी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी केवळ एका अर्जाला मंजुरी देण्यात आली, तर उर्वरित पाच अर्ज कोणतेही कारण न देता नामंजूर करण्यापाठीमागचे गौडबंगाल काय? एकाच गटातील आणि समान कागदपत्रांवर आधारित अर्ज असताना केवळ एका अर्जाला मंजुरी देणे आणि बाकी नाकारणे म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचार आहे, असा जोरदार आरोप करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी संतप्त नागरिकांनी कार्यालयात एका खाजगी व्यक्तीकडून ऑनलाइन प्रस्ताव नोंदणीची कामे करून घेतली जातात. या व्यक्तीद्वारे अर्जदारांकडून पैसे उकळले जात असल्याचा आरोप करत ‘ज्यांनी पैसे दिले त्यांच्या डायऱ्या मंजूर होतात, बाकींच्या नामंजूर केल्या जातात,’ अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. या आरोपांमुळे नगर भूमापन कार्यालयाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी भ्रष्टाचार, दिरंगाई आणि मनमानीविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उगळे यांनी पदाधिकाऱ्यांनी नगर भूमापन अधिकाऱ्यांना सोमवारपर्यंत सर्व प्रलंबित डायऱ्या आणि नोंदी योग्य कागदपत्रांच्या आधारे मंजूर कराव्यात. ज्यांच्या प्रस्तावात त्रुटी असतील त्यांना नोटिसा देऊन योग्य मार्गदर्शन करावे, असा दम दिला.