

सांगली : सांगली कोल्हापूर रस्त्यावर शास्त्री चौक ते शंभरफुटी रस्ता यादरम्यान बुधवारी भूमापन विभागाने 35 मीटर रुंदीप्रमाणे रस्ता हद्दीच्या खुणा पुर्ण केल्या. रस्त्याची हद्द निश्चित केल्यामुळे अनेक मालमत्तांचे तसेच खोक्यांचे अतिक्रमण स्पष्ट झाले. आता पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण हटवले जाणार आहे. त्यास महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी दुजोरा दिला.
शास्त्री चौक ते आदिसागर मंगल कार्यालयापर्यंतचा कोल्हापूर रस्ता हा प्रचंड रहदारीचा आहे. मात्र अतिक्रमणांमुळे तो अरूंद आहे. या अतिज्ञक्रमणांमुळेच वाहतूक कोंडीचा विषय रोजचाच झाला. अपघातही घडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला. रस्त्यांचे रुंदीकरण 30 मीटरने की 35 मीटरने हा विषयही चांगलाच गाजला.
आयुक्त गांधी यांनी या रस्त्याची दोनदा पाहणी केली. रस्ता रुंदीकरणात येणारी अतिक्रमणे काढण्यासाठी शासनाच्या भूमापन विभागाकडून हद्द मोजणी होणे आवश्यक होते.
भूमापन विभागाने सोमवारी 35 मीटर रुंदीप्रमाणे रस्त्याच्या हद्दीची मोजणी केली. बुधवारी या हद्दीच्या खुणा पूर्ण केल्या. भूमापन विभागाचे परीरक्षण भूमापक गणेश विभुते, परीरक्षण भूमापक शशिकांत नागरे यांनी हद्दीच्या खुणा केल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निखिल पाटील, महापालिकेच्या नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता यासिन मंगळवारे, आरेखक शामराव गेजगे उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने 2011-12 च्या दरम्यान, कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 35 मीटर रुंदीने जागा संपादित केली होती. संबंधित मिळकतधारकांना त्याचा मोबदलाही दिला होता. त्यानुसार कोल्हापूर रस्त्यावर शास्त्री चौक ते शंभरफूटीपुढे 300 मीटर अंतरापर्यंत हद्दीच्या खुणा पुर्ण केल्या आहेत.
अतिक्रमणांवर घाला हातोडा
या रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र अतिक्रमण हटवणे व पाणीपुरवठा वाहिन्या अन्यत्र हलवणे हे काम करणे आवश्यक होते. मात्र ते रखडले. त्यामुळे रस्ता रुंदीकरणास विलंब लागला. अशी कामे महापालिकेला तातडीने करावे लागणार आहे. गंभीर बाब म्हणजे एसटीच्या बसस्थानक आगाराची भिंत, अनेक मालमत्तांचे कुंपण, खोकीही अतिक्रमित जागेतच आहेत. त्यामुळे आता त्यावर हातोडा घालण्याची गरज आहे. आता तरी कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला गती येण्याची अपेक्षा आहे.