

कुरुंदवाड : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोलीस निवास लाईनमध्ये सर्पांचा थरकाप उडाल्याची घटना समोर आली आहे. या परिसरातून घोणस जातीच्या तब्बल 22 पिल्लांचा सापळा, तर नागिणीच्या सुमारे 50 ते 60 कातड्या आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्पमित्रांच्या अंदाजानुसार अजूनही 50 ते 60 पिल्ले परिसरात असण्याची शक्यता सर्प मित्रांनी वर्तवला आहे.
येथील पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी गोपाळ तेली व पोपट ऐवळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बोलत उभे असताना. त्यांच्या पायाखाली अचानक काही सरपटणाऱ्या वस्तू जाणवल्या आणि पाहतो तो काय सर्पाची पिल्ले त्यांच्या आजूबाजूने सरपटत होती!ताबडतोब त्यांनी इचलकरंजी येथील वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र सागर जंगले (कुरुंदवाड), शेखर पोवार आणि तन्मय बनसोडे यांच्याशी संपर्क केला. सर्पमित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली.
सर्पमित्रांच्या माहितीनुसार, घोणस जातीचा सर्प हा एकावेळी 60 ते 70 पिल्लांना जन्म देतो. ही माहिती लक्षात घेता पोलीस लाईनमध्ये अद्याप बऱ्याच संख्येने पिल्ले लपलेली असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर बावीसहून अधिक पिल्ले शोधून पकडण्यात आली.घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर झाडी, किचकट झुडपे व गवत वाढलेले दिसून आले. त्यामुळे सर्पांना वावर व अधिवास करण्यासाठी पोषक वातावरण मिळालं आहे. गटारी, पाण्याचे टाकी परिसर,खड्डे या ठिकाणीही सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलं, वृद्ध नागरिक, महिला यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.रहिवाशांनी तात्काळ झाडी व गवत साफ करून सर्पनियंत्रण मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली आहे.
घोणस सर्प अंडी घालत नसून एकावेळी ती 70 पिल्लांना जन्म घालते, पोलीस लाईनीत मिळून आलेली पिल्ली ही आठ दिवसाची आहेत. आणखीन पिल्ले या ठिकाणी मिळून येण्याची शक्यता आहे. झाडी-झुडपी आणि सर्पांना राहण्यासारखा हा आवार असल्याने याठिकाणी विविध जातीचे सर्प मिळून येण्याची शक्यता आहे,रात्रीच्यावेळी या आवारात फिरत असताना निदर्शनास येण्याची शक्यता असून पोलीस आणि कुटुंबीयांनी सावधानता बाळगावी.
सर्पमित्र राहुल अदात्तरे