

Candidate online application issue
कुरुंदवाड : कुरुंदवाड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांकडून अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत ऑनलाईन प्रणालीमुळे उमेदवारांची अक्षरशः दमछाक होत आहे. अर्ज भरण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली ऑनलाईन प्रणाली वारंवार बंद पडत असल्याने आणि डेटा सेव्ह न होण्याच्या तक्रारींमुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत अत्यंत अल्प असल्याने इच्छुक उमेदवारांकडून आपल्या उमेदवारीची पूर्तता करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये आणि सायबर कॅफेमध्ये प्रचंड धावपळ सुरू आहे. ऑनलाईन प्रणाली सुरू होताच काही सेकंदांतच सर्व्हर हँग होणे, माहिती अपलोड न होणे, दस्तऐवज स्वीकारले न जाणे, तसेच सबमिट केलेले फॉर्म “एरर” दाखवणे अशा अनेक तांत्रिक अडचणींचा उमेदवारांना सामना करावा लागत आहे.
दरम्यान, काही उमेदवारांनी याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित प्राधिकरणांकडे तोंडी तसेच लेखी स्वरूपात तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप या समस्येवर ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिक आणि उमेदवारांचे म्हणणे आहे.
कुरुंदवाड शहरातील सायबर कॅफे आणि ऑनलाईन सेवा केंद्रांमध्ये दिवसभर उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी अर्ज अपलोड न झाल्याने उमेदवारांना रात्री उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक पातळीवर उमेदवार आणि नागरिकांकडून शासनाने तत्काळ पर्यायी उपाययोजना कराव्यात, ऑनलाईन प्रणाली अधिक सक्षम आणि स्थिर करावी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व कार्यक्षमता राखण्यासाठी शासनाने या तांत्रिक त्रुटींवर तात्काळ तोडगा काढावा,अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.