

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने मध्यस्थी करत गतवर्षीच्या उसाला 100 रुपये हफ्ता देण्याचा तोडगा काढला होता. कारखान्यांनी तो न दिल्याने कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असलेले केंद्रीय मंत्री अमित शहा यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा माजी खास. राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यामुळे कुरुंदवाड पोलिसांनी स्वाभिमानीच्या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांनी स्वाभिमानीचे विश्वास बालीघाटे, बंडू पाटील, विवेक चौगुले, अण्णासाहेब गुदले, बंडू चौगुले, रावसाहेब आलासे या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या वर्षी ऊस दराचा आंदोलनाचा भडका उडाला होता. शेतकरी संघटनेने ऊस तोडी बंद पाडल्या होत्या. अनेक दिवस कारखाने बंद होते. केंद्र सरकारने शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या समेट घडवत शंभर रुपयांचा हप्ता देण्याचा तोडगा काढला होता. या तोडग्याला एक वर्ष पूर्ण होत आले तरी कारखानदारांनी शेतकऱ्यांना शंभर रुपयाचा हप्ता न दिल्याने स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर दौऱ्यावर येत असलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांना काळे झेंडे दाखवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता.
शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनाची तयारी केली होती. तत्पूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. कुरुंदवाड, शिरढोण, हेरवाड, अकीवाट, खिद्रापूर आणि राजापूर येथील स्वाभिमानीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सपोनी रविराज फडणीस, उपनिरीक्षक सागर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे, फारूक जमादार, सागर खाडे, सागर यादव यांनी ताब्यात घेतले आहे.