

Kolhapur Kurundwad Flower Market
कुरुंदवाड : शासनाने कृत्रिम फुलांवरील बंदी घातल्यानंतर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण उजळला होता. "यंदा दिवाळीत नैसर्गिक फुलांना चांगला भाव मिळेल," अशी त्यांची अपेक्षा होती. झेंडू, शेवंती, गुलछडी यांसारख्या फुलांचे भरघोस उत्पादनही आले होते. परंतु नियतीला जणू काही वेगळंच मंजूर होतं, ऐन दिवाळीत फुलबाजारात झालेल्या अनपेक्षित अवकाळीमुळे दर कोसळले आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचे ‘दिवाळं’ निघालं.
सकाळी १०० रुपयांपर्यंत असलेले दर दुपारनंतर वीस रुपयांवर आले. कुरुंदवाडच्या बाजारपेठेत दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते,एका हातात फुलांच्या पोत्यातली मंदावलेली सुगंधी पाकळी आणि दुसऱ्या हाताने डोळे पुसणारा शेतकरी. अनेकांनी शेवटी फुले आहे तशीच रस्त्यावर टाकून परतीचा रस्ता धरला. त्यांचे ओले डोळे आणि ओठांवरचे नि:शब्द प्रश्न पाहून दिवाळीचा आनंद कुठेतरी हरवून गेला होता.
मागील वर्षीही अशीच स्थिती निर्माण झाली होती, मात्र यंदा कृत्रिम फुलांवरील बंदीमुळे नैसर्गिक फुलांना भाव मिळेल, या विश्वासाने शेतकऱ्यांनी मोठी गुंतवणूक केली. खतं, मजुरी, पाणी, औषधं सगळं वाढलेल्या खर्चात त्यांनी दिवसभराचा घाम गाळून फुलबाग फुलवली. पण बाजारात भाव पडल्यानंतर त्यांची सर्व स्वप्नं कोमेजली.
सणासुदीच्या काळात फुलांना योग्य भाव मिळत नसेल, तर शेतकरी जगणार कसा?” असा थेट सवाल करत जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका माधुरी सावगावे म्हणाल्या “फुलशेतीसाठी हमीभावाची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन, पुढील हंगामात योग्य दराची हमी देण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. अन्यथा अनेक शेतकरी आगामी हंगामात फुलशेतीपासून हात आखडता घेतील.