कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील शिकलगार वसाहत परिसरातील पूरग्रस्तांचा पंचनामा अद्याप केलेला नाही. त्यामुळे पूरग्रस्तांनी पालिकेवर दुसऱ्यांदा मोर्चा काढत आक्रोश केला. आज (दि. १३) ११ वाजता पूरग्रस्त महिला तलाठी कार्यालयात गेल्या. मात्र, त्यांना पालिकेत पाठवले. पालिकेत गेल्यानंतर त्यांना परत तलाठी कार्यालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे संतप्त महिलांनी एकच गोंधळ घालत आक्रोश केला. आमचे पंचनामे तत्काळ न झाल्यास तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी पालिका परिसरात तणावपूर्ण वातावरण बनले होते. (Kolhapur flood)
दरम्यान, संतप्त महिलांनी प्रश्नांची सरबत्ती केली. कर्मचारी आणि पूरग्रस्त महिलांच्यामध्ये वादावादी झाली. तर नागरिकांसोबतही हमरी-तुमरीचा प्रसंग घडला. पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी, अजित दिपणकर, गिरीधर मधाळे यांनी संबंधित पंचनामा करण्यासाठी वेगळे पथक आहे. ते कुठे आहे. ते पाहून त्यांना सूचना करू, असे सांगितल्याने पूरग्रस्त शांत झाले. (Kolhapur flood)
कुरुंदवाड येथील शिकलगार वसाहतीत कृष्णा, पंचगंगा नदीच्या महापुराचे पाणी आले होते. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या पूरग्रस्तांना दत्त महाविद्यालय, एस.के . पाटील महाविद्यालयात स्थलांतर करण्यात आले होते. त्यांना तत्काळ सानुग्रह अनुदान देऊ, असे आश्वासन देण्यात आले होते. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चाही काढण्यात आला होता. महापूर ओसरल्यानंतर नागरिक आपल्या घरी परत फिरले आहेत. हाताला रोजगार नसल्याने होता, तो पैसा महापुरात खर्च झाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून पंचनामा करणारे पथक या भागाकडे फिरकलेच नाही, असा आरोप पूरग्रस्त महिलांनी केला. (Kolhapur flood)
या मोर्चाबाबत तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या मोर्चात आरती चव्हाण, अनिता तांबडे, मंगल आवळे, कविता आवळे, सुशीला शिकलगार, मालन शिकलगार आदी उपस्थित होते.