नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा: कोकणासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात दमदार पडत असलेल्या पावसामुळे श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या २४ तासांत ८ फुटाने वाढ झाली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील कृष्णा व पंचगंगा नदीच्या संगमावर असलेले श्री संगमेश्वर मंदिर पाण्यात गेले आहे.
काही दिवसांपूर्वी दत्त मंदिर पाण्यात होते. परंतु पाणी उतरल्यामुळे महापुराची भीती मावळली होती. परंतु, अचानक ८ फुटाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे महापुराची चर्चा परत सुरू झाली आहे. पाटबंधारे विभागाने आज (दि.८) परिपत्रक काढून कृष्णा, पंचगंगा नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे.
कृष्णा, पंचगंगा नद्या दुधडी भरून वाहत आहेत. नदीकाठची गवती कुरणे पाण्याखाली गेली आहेत. पाऊस वाढत राहिल्यास परत दत्त मंदिरात पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचलंत का ?