kalamba jail : प्रशासनाला नाही लाज; कैद्यांना चढलाय ‘माज’!

kalamba jail : प्रशासनाला नाही लाज; कैद्यांना चढलाय ‘माज’!

[author title="सुनील कदम" image="http://"][/author]

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या उचापतींमुळे या कारागृहाची राज्यभर चर्चा होताना दिसत आहे. कारागृह प्रशासनाच्या 'अर्थपूर्ण' नाकर्तेपणाचा आणि निर्लज्जपणाचा हा सगळा परिपाक आहे.

राज्यभरातील नामचीन कैदी!

राज्यभरातील एकापेक्षा एक नामचीन कैदी आज कळंबा कारागृहात आहेत. यामध्ये मुंबई बॉम्बस्फोटापासून ते टाडा, मोका, खून, बलात्कार, दरोडे, चोर्‍यामार्‍या आदी गुन्हेगारीतील सगळी 'बाराखडी' तोंडपाठ केलेले अनेक महाभाग इथे आहेत. यापैकी अनेक कैद्यांचे कारागृहाबाहेरील जगात मोठे नेटवर्क आहे, अनेक कैदी आर्थिकदृष्ट्या गडगंज आहेत, काही कैद्यांना त्यांच्या त्यांच्या भागातील राजकारण्यांचा वरदहस्त लाभलेला आहे. या सगळ्याचा यथायोग्य वापर करून कळंब्यातील काही कैदी कारागृहात राहूनसुध्दा ऐषोआरामी जीवन जगताना दिसत आहेत आणि या सगळ्याला हातभार लागत आहे तो कारागृहातीलच काही घरभेद्यांचा! त्यामुळे काही नामचीन गुंडांनी कळंबा कारागृहाचे 'विश्रामगृहात' रूपांतर करून टाकलेले दिसत आहे. आता तर कैद्यांनी कारागृहातच खूनखराबा सुरू करून त्याचा प्रत्ययही दिला आहे.

नेटवर्क कनेक्शन!

गेल्या काही दिवसात कळंबा कारागृहात जवळपास दिडशे मोबाईल सापडले आहेत. गांजाच्या पुड्या आणि दारूच्या बाटल्या तर किरकोळ बाब वाटू लागल्या आहेत. कळंब्यातील नामचीन गुंडांना इथे मोबाईल आणि पैशांसह आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या कैद्यांचे कारागृहाबाहेरील नेटवर्क काम करताना दिसत आहे. कारागृह प्रशासनातील अनेकांचे या नेटवर्कशी कनेक्शन जोडले गेले आहे. त्या माध्यमातून आणि 'अर्थपूर्ण' तडजोडीनंतर अशा वस्तू कारागृहात राजरोसपणे पोहोच होताना दिसतात.

आरोग्य तपासणीचा फार्स!

वेगवेगळ्या कारणांसाठी कारागृहातील कैद्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते, कधी त्यांना काही काळ सीपीआरमध्ये भरतीदेखील केली जाते, उपचारानंतर पुन्हा कारागृहात रवानगी केली जाते. पण या सगळ्याची सखोल झाडाझडती घेण्याची गरज आहे. कारण या बाबतीत असा बोलबाला आहे की, काही ठराविक कैद्यांना, ठराविक दिवसांनी वैद्यकीय तपासणीसाठी म्हणून बाहेर काढले जाते, वैद्यकीय उपचाराचे कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करून संबंधित कैद्यांना काही काळासाठी त्यांच्या 'इप्सीत स्थळी' नेले जाते, त्या ठिकाणी काही काळ त्याची 'अय्याशी' झाली की त्याला म्हणे पुन्हा कारागृहात नेले जाते. हा बोलबाला जर खरा असेल तर तो अतिशय गंभीर समजायला हवा. कारागृह प्रशासनाच्या सहकार्याशिवाय कैद्यांची ही अशी अय्याशी शक्यच नाही. त्यामुळे गेल्या वर्षभरात ज्या ज्या कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी कारागृहाबाहेर नेले गेले, त्यांची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.

कर्मचार्‍यांचे लागेबांधे!

कारागृह प्रशासनातील अनेक कर्मचार्‍यांशी काही कैद्यांचे 'अर्थपूर्ण' जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाल्याचीही चर्चा आहे. या कर्मचार्‍यांकडून कैद्यांच्या बाह्य जगतातील नेटवर्कशी संपर्क साधणे, निरोपांची देवाण-घेवाण करणे, प्रसंगी काही वस्तू संबंधित कैद्यांना कारागृहात पोहोच करणे, असे उद्योग केले जात असल्याचे समजते. परवा कारागृहात झालेल्या खुनाचा या अंगानेही तपास होण्याची गरज आहे. कारागृह प्रशासनातील कर्मचार्‍यांचा कैद्यांशी निर्माण झालेला हा जिव्हाळा घातक समजायला हवा आणि त्याचे कठोर ऑपरेशन होण्याची गरज आहे. अन्यथा कैद्यांच्या दृष्टीने कारागृह हे कारागृह न राहता 'विश्रामगृह' होण्याचा धोका आहे.

मोबाईलचे सीडीआर का तपासले नाहीत?

गेल्या काही दिवसात कळंबा कारागृहात तब्बल दिडशे मोबाईल सापडले आहेत. निश्चितच हे मोबाईल या महोदयांनी गेम खेळण्यासाठी वापरले नसणार आहेत. या मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कारागृहाबाहेरच्या राज्यभरातील नेटवर्कशी काहीतरी बातचित केली असेल, निश्चितच काहीतरी नवीन प्लॅन केले असतील, कारागृहात बसूनच आणखी कुणाच्या सुपार्‍या दिल्या-घेतल्या असतील, फोनवरून धमक्या देवून कुणाकडून खंडण्या गोळा केल्या असतील अशा बर्‍याच काही उचापती कारागृहातील या गुंडांनी निश्चितच केल्या असतील. त्यांच्या या उचापतींमुळे राज्यात नव्याने शेकडो गुन्ह्यांची भर पडली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारागृहात सापडलेल्या मोबाईलचे सर्व सीडीआर तपासले तर या सगळ्यावर नव्याने प्रकाशझोत पडू शकतो. पण कारागृह प्रशासनाने तसे काही केलेले दिसत नाही. कदाचित तसे करणे प्रशासनाला त्यांच्या 'गैरसोयीचे' वाटत असावे. कारण त्यातून कदाचित कारागृह प्रशासनाचाच बुरखा फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या वरिष्ठांनी या प्रकरणी लक्ष घालून इथे सापडलेल्या सर्व मोबाईलचे सीडीआर तपासण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news