

Pimpalgaon Vhannur gaur sighting
सिध्दनेर्ली : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द आणि व्हन्नूर परिसरात मंगळवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास गव्यांचे कळप दिसल्याने दोन्ही गावांमधील शेतकरी वर्गात मोठी भीती निर्माण झाली आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास पिंपळगाव खुर्द येथील जंबर ओढ्याच्या बाजूने दोन ते तीन गवे कागल-मुरगूड राज्यमार्गाच्या दिशेने आले आणि त्यांनी हा वर्दळीचा रस्ता ओलांडून दुधगंगा नदीकडील शिवारात प्रवेश केला. रस्ता ओलांडताना या गव्यांनी एका कारला धडक दिली होती, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर तात्काळ नागरिकांनी सामाजिक माध्यमांद्वारे माहिती देऊन इतरांना सावध केले.
या घटनेनंतर काही वेळाने हाच कळप पिंपळगाव येथील ग्रामपंचायत परिसरातही दिसल्याचे सांगण्यात येत आहे. येथील ग्रामपंचायतीजवळ आणि तेथून बसवेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही नागरिकांना गव्यांचा हा कळप काही काळ उभा असलेला निदर्शनास आला होता. या घटनेचे व्हिडिओ नागरिकांनी त्वरित आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर केले आहेत. मात्र, त्यानंतर हे गवे नेमके कोणत्या दिशेने गेले, याचा पत्ता लागलेला नाही.
सध्या ऊस तोडणीचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आणि रात्रीच्या वेळी शेतीची कामे सुरू असताना अचानक गव्यांचा वावर सुरू झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. भीतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्यासाठी किंवा अन्य कामांसाठी जाणे टाळले आहे. त्यामुळे या गव्यांचा वनविभागाने तातडीने शोध घेऊन योग्य बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपळगाव खुर्द आणि परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे.