

Kadvi dam 65 percent storage
विशाळगड : शाहूवाडी तालुक्यातील कडवी धरण पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आजअखेर ८५४ मिमी पावसाची नोंद झाली असून, गेल्या २४ तासांत सरासरी ४१ मिमी पाऊस पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा ६४.८९ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४०४ मिमी पावसाच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरणात १७ टक्के पाणीसाठा अधिक असल्याची माहिती कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी दिली.
कडवी धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. दररोज सरासरी तीन ते चार टक्क्यांनी पाणीसाठा वाढत आहे. १ जूनपासून आजअखेर ८५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता ७१.२४० दलघमी (२.५१ टीएमसी) असून, दरवर्षी धरण १०० टक्के भरते. विशेष म्हणजे, गतवर्षी धरण तीनदा ओव्हरफ्लो झाले होते.
शुक्रवारी (२७ जून) सकाळी ७ वाजता धरणाची पाणीपातळी ५९५.३५ मीटर होती आणि पाणीसाठा ४६.२३ दलघमी (१.६३ टीएमसी) होता. गतवर्षी याच तारखेला धरण ४८.७७ टक्के भरले होते. सध्या धरणातून २२० क्यूसेस प्रतिसेकंद पाणी कडवी नदीपात्रात सोडले जात आहे, तर पाण्याची आवक ७४७ क्यूसेस आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने शेतकऱ्यांची भात लागवडीसाठी लगबग सुरू आहे.
पर्यटकांना प्रवेशबंदी कडवी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने, पर्यटकांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्या धरणावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने आणि धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने, कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे.
- खंडेराव गाडे, शाखा अभियंता