विशाळगड : कडवी खोऱ्यातील २२ गावांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेला निनाई परळे (ता शाहूवाडी) येथील कडवी मध्यम प्रकल्प 'ओव्हर फ्लो' होण्याच्या मार्गावर आहे. धरणात आजमितीला ९६ टक्के पाणीसाठा आहे. २.५१ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेला हा प्रकल्प काही तासांत आता १०० टक्के भरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केला आहे. कडवी नदीकाठावरील कोपार्डे, भोसलेवाडी, शिरगाव, सवते-सावर्डे ,सरूड-पाटणे, येळाणे ही बंधारे पाण्याखाली आहेत.
कडवी धरणाची पाणी साठवण क्षमता २.५१ टीएमसी आहे. कडवी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक झपाट्याने होत असल्याने धरण भरण्याच्या मार्गावर आहे. मागील २४ तासांत १०० मिमी तर रविवारी दुपारी ४ वाजता ८ तासांत ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी (दि २९) रोजी सकाळी ७ वाजता धरण ९२.८१ टक्के भरले होते. तर सायंकाळी चार वाजता ९६ टक्के भरले. सध्या धरणाची पाणीपातळी ६००.५० मीटर इतकी आहे. धरणात ६८.४३ दलघमी इतका पाणीसाठा आहे. कडवी पाणलोट क्षेत्रात आजअखेर १७९० मिमी इतका पाऊस बरसला असून गतवर्षी १२८२ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा यंदा ५०८ मिमी पाऊस जादा झाला आहे, हे या आकडेवारीवरून समोर येते. धरणातून कडवी नदीपात्रात विद्युत गृहातून प्रतिसेकंद २२० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन कडवी धरण शाखा अभियंता खंडेराव गाडे यांनी केले आहे.
कडवी पाणलोट क्षेत्रात कडवी या प्रमुख मध्यम प्रकल्पासह मानोली, कासार्डे, कांडवन, पालेश्वर हे लघु पाटबंधारे प्रकल्प येतात. चारही लघू प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. गतवर्षी याच दिवशी पाणीसाठा ४५.२५ दलघमी इतका होता. तर धरण १.६० टीएमसी म्हणजे ६४ टक्के भरले होते अशी माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. कोपार्डे, भोसलेवाडी, शिरगाव, सवते-सावर्डे ,सरूड-पाटणे बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. कडवी नदीचे पाणी पात्राबाहेर गेल्याने नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीमुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पाण्याखालील बंधारे : कोपार्डे, भोसलेवाडी, शिरगाव, सवते-सावर्डे ,सरूड-पाटणे, येळाणे
आजअखेर एकूण पाऊस : १७९० मिमी
गतवर्षी याच दिवशी : १२८२ मिमी