

Jambhali Yadrav Road Tractor Trolley Accident
शिरढोण : जांभळी–यड्राव रस्त्यावर उसाने भरलेल्या दोन भरधाव ट्रॅक्टर-ट्रॉलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात शुक्रवारी (दि.२) दुपारी ३ च्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झाल्याची घटना घडली नाही. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प राहिली.
जांभळी गावाजवळील कदम मळ्याच्या शेजारी हा अपघात घडला. समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही ट्रॅक्टर-ट्रॉली चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि ही धडक झाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर उसाने भरलेल्या ट्रॉली रस्त्यावर आडव्या उभ्या राहिल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
अपघातानंतर दोन्ही ट्रॅक्टर चालकांमध्ये नुकसानभरपाईच्या कारणावरून वाद सुरू झाला. त्यामुळे रस्ता मोकळा होण्यास विलंब झाला. यावेळी जांभळी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी पुढाकार घेत मध्यस्थी केली. त्यांच्या समंजस हस्तक्षेपामुळे दोन्ही चालकांतील वाद मिटविण्यात आला. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर-ट्रॉली बाजूला काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, ऊस वाहतुकीच्या हंगामात या मार्गावरून अवजड वाहनांची वर्दळ वाढली असून वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.