

वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे सिंधुदुर्ग व कोकणच्या विकासाला मोठी चालना
हापूस आंब्यासह फळे, मत्स्यउत्पादने व खनिजांना नव्या बाजारपेठा उपलब्ध
विजयदुर्ग आंतरराष्ट्रीय बंदराला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी
घाटमार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन सुरक्षित व कमी खर्चिक प्रवास
उद्योग, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीसाठी हा रेल्वेमार्ग गेम-चेंजर ठरणार
हा प्रस्तावित रेल्वेमार्ग राज्याच्या आणि देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हा आणि संपूर्ण कोकणच्या विकासासाठी हा रेल्वेमार्ग मैलाचा दगड ठरेल. जिल्ह्यात उत्पादित होणारी फळे, मत्स्यउत्पादने, गौण खनिजे आदी मालाला पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठा सहज उपलब्ध होतील.
आजपर्यंत कोकणातील हापूस आंबा प्रामुख्याने मुंबई बाजारपेठेतच पाठवला जात होता. मात्र हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, सोलापूरसह थेट नागपूरपर्यंत हापूस आंब्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.
विजयदुर्ग येथे प्रस्तावित असलेले आंतरराष्ट्रीय बंदर या रेल्वेमार्गामुळे थेट जोडले जाणार आहे. त्यामुळे बंदराला थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळून आयात-निर्यातीच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. सिंधुदुर्गातील चिरे, खनिजे तसेच अन्य साहित्य पश्चिम महाराष्ट्रात पाठवणे सुलभ होईल, तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाची मळी, दुग्धजन्य पदार्थ व औद्योगिक माल निर्यातीसाठी विजयदुर्ग बंदरात आणता येईल.
सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र दरम्यानची वाहतूक प्रामुख्याने घाटमार्गांवर अवलंबून आहे. मात्र वाढत्या वाहतुकीमुळे हे घाटमार्ग कमकुवत व अपघातप्रवण झाले आहेत. रेल्वेमार्ग उपलब्ध झाल्यास प्रवासी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात रेल्वेकडे वळेल. यामुळे घाटमार्गांवरील ताण कमी होईल, वाहतूक अधिक सुरक्षित, जलद व कमी खर्चिक ठरेल.
आजवर कोकण व्यवहारिक आणि भावनिकदृष्ट्या मुंबईशी जोडले गेले होते. मात्र या रेल्वेमार्गामुळे सिंधुदुर्ग व कोकण पश्चिम महाराष्ट्राशी अधिक जवळ येईल. मुंबई परिसर सध्या सॅच्युरेशन पॉइंटवर पोहोचला असून रोजगार व निवासाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील शहरांमधील रोजगार, उद्योग व व्यवसायाच्या संधींचा फायदा कोकणातील तरुणांना होऊ शकतो.
पर्यटनाच्या दृष्टीनेही हा रेल्वेमार्ग अत्यंत उपयुक्त ठरेल. रेल्वेमार्गाने येणारे पर्यटक वैभववाडी किंवा कणकवली येथे उतरतील. येथे पर्यटक मार्गदर्शन केंद्र उभारल्यास संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन सैर घडवता येईल. त्यामुळे पर्यटकांचा मुक्काम किमान तीन-चार दिवसांचा होईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
हा मार्ग सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणार असल्याने सध्या अविकसित असलेल्या भागाच्या विकासाला मोठी गती मिळेल. वैभववाडीसारख्या तालुक्यात एमआयडीसी, पर्यावरणपूरक उद्योग, फौंड्री व ऑटोमोबाईल उद्योग उभारण्याच्या संधी निर्माण होतील. रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे उद्योगांना आवश्यक असलेली वाहतूक सुविधा उपलब्ध होईल आणि रोजगारनिर्मितीला बळ मिळेल.
कोकणातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. भाजीपाला, फळे, धान्ये, बांधकाम साहित्य, घरगुती उपकरणे यांचा पुरवठा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातून होतो. हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यानंतर या दोन्ही प्रांतांमधील व्यापार कैकपटीने वाढेल.
सध्या कोल्हापूर-सिंधुदुर्ग रस्ते प्रवासासाठी दीड ते दोन तास लागतात. रेल्वेमार्ग सुरू झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या एका तासात, तर कणकवली-कोल्हापूर सव्वा तासात पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे सिंधुदुर्गातील तरुणांना रोज कोल्हापूरला नोकरीसाठी ये-जा करणे शक्य होईल, जसे मुंबई उपनगरातील प्रवासी रोज मुंबईत ये-जा करतात.