कोल्हापूर : गारगोटीतील हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाचे अपहरण
गारगोटी : पैशासाठी गारगोटीतील हॉटेल व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करून हॉटेल व्यवसायिकाला धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हाॅटेल व्यावसायिक मारूती पावले यांनी बुधवारी (दि.१८) दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरूद्धात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रविंद्र राजाराम सुतार, विजय नारायण वास्कर (रा. गारगोटी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मारूती पावले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलगा अमोल पावले मंगळवारी (दि.१८) दुपारी आपली थार गाडी घेऊन हाॅटेलकडे जातो, म्हणून सांगून गेला होता. दुपारनंतर हाॅटेलकडे गेलो असता मुलगा व गाडी आढळून आली नाही. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी कोल्हापूरला गेला असेल, असे समजून कामाला लागलो. मंगळवारी सकाळी ११.१५ वा दरम्यान एका मोबाईल नंबरवरुन रविंद्र सुतार याने फोन करून मुलगा अमोल माझ्या ताब्यात आहे. विजू वास्करचे पैसे कधी देणार. तुझ्या मुलाचे बरे वाईट झाले तर आम्हाला विचारायचे नाही. तुझ्या मुलाला कैदेत डांबून ठेवले आहे, अशी धमकी देऊन फोन ठेवला.
थोड्या वेळाने रवि सुतार यास फोन करून विचारणा केली असता तुला माहित नाही का? तुझ्या मुलाने पैसे घेतले आहेत. पैसे बुडवायची तुझी प्रवृत्ती आहे का? पैसे आण आणि मुलाला घेऊन जा, असे रवि सुतार याने सांगितले. पैशाबाबत पत्नीला विचारणा केली असता अमोलने पैशाच्या व्यवहाराबाबत काहीही सांगितले नाही. काही वेळाने विजय वास्कर याचाही एका मोबाइल नंबरवरून धमकीचा कॉल आल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी रविंद्र सुतार व विजय वास्कर या दोघांविरोधात भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.