

कोल्हापूर: गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईटस्ना बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी गुरूवारी याबाबतचा आदेश काढला. दि.१२ ते दि.१७ सप्टेंबरपर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. या आदेशाचा भंग केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेश आगमन मिरवणुकीत शहरासह जिल्ह्यात अनेक मंडळांनी लेसर लाईटस्चा वापर केला होता. या लाईटस्चा डोळ्यांवर मोठा परिणाम होत असतो. मणेरमळा, उचगांव (ता. करवीर) येथील मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या एका तरूणाच्या डोळ्यावर लेसर लाईट पडल्याने त्याच्या डोळ्याचा पडदा तसेच बुबळाला इजा झाली होती. लेसर किरणांनी एका पोलिस कर्मचाऱ्याला डोळ्याचा त्रास सुरू झाला. गणेश आगमन मिरवणुकीनंतर डोळ्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती.
याबाबत ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटी, कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनी पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले होते. या निवेदनाद्वारे डोळ्याला घातक ठरणाऱ्या या लेसरच्या लाईटस्ना बंदी घालण्याची मागणी केली होती. शहरातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात पोलिस नियंत्रण कक्षाकडे फोन करून लेसर लाईट बंद करण्याबाबत तक्रारी केल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस अधिक्षकांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेसर लाईटवर निर्बंध घालण्याबाबत आदेश द्यावेत असे पत्र जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना सोमवार दि.९ सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानूसार अपर जिल्हादंडाधिकारी तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये मानवी जीवीताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्याचा शक्यता असल्याची खात्री पटल्याने लेसर लाईटस्च्या वापरास प्रतिबंध करण्याची आवश्यकता असल्याचे तेली यांनी आदेशात म्हटले आहे. त्यामुळे दि.१२ सप्टेंबर ते दि.१७ सप्टेंबर या कालावधी मिरवणुकीत लेसर लाईटस् वापरण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचा आदेश काढण्यात आला.
डीजेचा दणदणाट आणि प्रखर किरणांचा मारा करणाऱ्या लेसर लाईटस्चा वापर म्हणजेच जल्लोषी मिरवणूक असा समज करून घेतलेल्या काही मंडळांना या आदेशाने मोठा दणका बसणार आहे. मंगळवारी (दि.१७) सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीसाठी लाखो रुपये खर्च करून अशा लेसर लाईटस्च्या वापराचे अनेक मंडळांनी नियोजन केले आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने काढलेल्या या आदेशामुळे अशा मंडळांचे आता मिरवणुकीतील झापुकझुपक बंद होणार आहे. त्यांना पारंपरिक रोषणाईवरच भर द्यावा लागणार आहे.