Kolhapur Drought List | हातकणंगले दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकऱ्यांत संताप

पिके करपली, जमिनीला भेगा; कृषी विभागाचा मात्र सरासरीच्या ८० टक्के पाऊस पडल्याचा दावा
Kolhapur Drought
अंबप : येथील करपलेले सोयाबीन पिकPudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra Drought List

कासारवाडी : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे हातकणंगले तालुक्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून, सोयाबीन आणि भुईमुगाची पिके करपली आहेत. अशा परिस्थितीत शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हातकणंगलेचा समावेश न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, तालुक्यात सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाल्याचा दावा तालुका कृषी विभागाने केला आहे.

जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही अनेक दिवस पाऊस गायब राहिला. त्यामुळे सोयाबीन आणि भुईमूग या प्रमुख खरीप पिकांवर पाण्याचा ताण आला. पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारल्याने पिकांनी माना टाकल्या असून, अनेक ठिकाणी शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. बियाणे, खते, मशागत यासाठी केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

Kolhapur Drought
Kolhapur News: शाहूवाडीत पावसाची दडी; माळरानावरील पिके करपू लागली, शेतकरी हवालदिल

नुकतीच शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, आजरा, गगनबावडा आणि चंदगड या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, हातकणंगले तालुका यादीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासकीय मदतीपासूनही वंचित राहावे लागणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

पाऊस असमान; तरी दुष्काळाच्या यादीतून वगळले

हातकणंगले तालुक्यात पावसाचे प्रमाण भौगोलिकदृष्ट्या असमान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. काही भागात पाऊस झालेला असला तरी अनेक गावांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पन्हाळा तालुक्यातून हातकणंगलेच्या काही भागात पावसाचे पाणी येते. पन्हाळा तालुका दुष्काळग्रस्त यादीत असताना हातकणंगलेचा समावेश न झाल्याबद्दल शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

Kolhapur Drought
Kolhapur Crime | 'आमच्या दारात फटाक्यांची माळ कोणी लावली?’ तिघांचा तरुणावर कोयत्याने हल्ला

चालू खरीप हंगामात मंडळनिहाय निरीक्षणानुसार हातकणंगले तालुक्यात सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला आहे. तसेच तालुक्यात सलग २१ दिवस पावसाचा खंड पडलेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत हातकणंगलेचा समावेश झालेला नाही.

— स्वप्निल माने, तालुका कृषी अधिकारी, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यात नेहमीच पाऊस कमी असतो. यंदाच्या हंगामात पावसाचा खंड पडल्याने पिके करपली आहेत. प्रत्यक्ष शेतातील परिस्थिती गंभीर असतानाही शासनाने हातकणंगलेला दुष्काळग्रस्त यादीतून वगळले आहे. हा येथील शेतकऱ्यांवर अन्याय आहे.

— शिवाजी माने, अध्यक्ष, जय शिवराय किसान संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news