Kolhapur Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीला पंचगंगेत विसर्जन की इराणी खणीत?

Kolhapur Ganesh Visarjan : अनंत चतुर्दशीला पंचगंगेत विसर्जन की इराणी खणीत?
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी घातलेली बंदी झुगारून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शनिवारी घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगेतच केले. घाटाकडे जाणारा रस्ता अडविण्यासाठी घातलेले बॅरिकेडस्ही पोलिसांसमोरच तोडले. त्यानंतर अनेक भाविकांनी नदीच्या वाहत्या पाण्यात लाडक्या गणरायाला निरोप दिला. आता या आठवड्यात अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन पंचगंगेतच होणार की इराणी खणीत? अशी चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

प्लास्टर ऑफ पॅरीसची गणेशमूर्ती आणि त्यावरील रासायनिक रंगांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषित होत असल्याने, पंचगंगेत विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या मतानुसार, धर्मशास्त्रानुसार वाहत्या पाण्यातच मूर्तींचे विसर्जन करणे योग्य आहे. त्यामुळेच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी पंचगंगेत विसर्जनासाठी परवानगी मागितली होती. परंतु जिल्हा प्रशासनाने न्यायालयाचे आदेश असल्याचे सांगून, नदीकडे जाणारे मार्ग बॅरिकेडस् लावून अडविले होते. एकही गणेशमूर्ती पंचगंगा घाटावरून नदीत विसर्जित होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते.

सन 2020 आणि सन 2021 मध्ये कोरोनामुळे पंचगंगा नदीत मूर्तींचे विसर्जन करू दिले नव्हते. गेल्या वर्षीही जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांनी पंचगंगेत विसर्जनासाठी परवानगी नाकारली होती. नदीकडे जाणारे मार्ग बॅरिकेडस् लावून अडविण्यात आले होते. त्यामुळे गेल्यावर्षी एकाही गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीत झाले नाही. त्यावेळी अनेक सार्वजनिक तरुण मंडळांनीही महापालिकेला सहकार्य केले. परिणामी, घरगुती गणेशमूर्तींसह 21 फुटांपर्यंतच्या सर्वच गणेशमूर्तींचे विसर्जन रंकाळ्याजवळच्या इराणी खणीत करण्यात आले. त्यानुसार, यंदाही घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीतच करण्यासाठी महापालिकेने आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यासाठी मोठी यंत्रणा राबविली आहे.

विसर्जन मिरवणूक मार्ग बदलणार?

विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांच्यावतीने देश-विदेशातील नृत्य पथकांसह विविध मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. महाद्वार रोडवरून मिरवणूक नेणे मंडळांसाठी महत्त्वाचे असते. गेल्यावर्षी पंचगंगेत विसर्जनाला बंदी घातल्यानंतर गंगावेसमधून पुढे रंकाळा स्टँडमार्गे इराणी खणीकडे मिरवणूक वळविली होती. गंगावेसमधून मंडळांचे कार्यकर्ते पंचगंगेकडे गणेशमूर्ती घेऊन जाऊ नयेत यासाठी बॅरिकेडस् लावून अडविण्यात आले होते. यंदा पंचगंगा घाटाजवळचे बॅरिकेडस् हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तोडले. अनंत चतुर्दशीला तर शेकडो कार्यकर्ते असतात. मग त्यावेळी जिल्हा प्रशासन, पोलिस काय करणार? असा प्रश्न आहे. परिणामी सद्य:स्थितीत महापालिकेने महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, रंकाळा असा मार्ग राहणार की गंगावेसमधून सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते पंचगंगा नदीकडे गणेशमूर्ती नेणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news