Kolhapur Gaganbawda highway| कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग पूर्णत्वाला 2028 उजाडणार

16 कि.मी.चा मार्ग पूर्ण; बालिंगा पूल डिसेंबरपर्यंत खुला होण्याची शक्यता
Kolhapur Gaganbawda highway
कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग पूर्णत्वाला 2028 उजाडणार
Published on
Updated on

कोल्हापूर : कोकणासह गोव्यात जाणारी सर्वाधिक वाहतूक होणार्‍या कोल्हापूर-गगनबावडा महामार्ग पूर्णत्वाला जाण्यासाठी 2028 साल उजाडणार आहे. विविध कारणांनी रखडलेल्या या महामार्गाला पुढील वर्षापासून गती येईल, अशी शक्यता आहे. तोपर्यंत या महामार्गावरून सावकाशच पुढे जावे लागणार आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून कोल्हापूर-गगनबावडा महामार्गाचे क्राँकीटसह रुंदीकरण करण्यात येत आहे. दोन टप्प्यांत हे काम केले जाणार आहे. यापैकी पहिला टप्पा कोल्हापूर ते कळे हा 16 कि.मी.च्या मार्गाचे सुमारे 95 टक्के काम झाले आहे. या मार्गावरील रस्त्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, पुलांची कामे रखडली आहेत. या 16 किलोमीटरच्या अंतरात सर्वात मोठा भोगावती नदीवरील बालिंगा येथील पुलाचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास डिसेंबर उजाडेल, असे विभागाचे म्हणणे आहे. वेळेत सर्व काम झाले, तर नव्या वर्षात हा नवा पूल वाहतुकीसाठी खुला होईल, अशी शक्यता आहे. कळे-मरळीदरम्यान पुलाच्या एका बाजूच्या भरावाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. भामटे-कळंबेदरम्यान वळणावर रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. चिंचवडे-भामटे या पुलाचेही काम अद्याप अपूर्ण आहे. ही सर्व कामे झाल्यानंतरच कोल्हापूर ते कळे या संपूर्ण मार्गावर सुसाट वेगाने प्रवास करता येणार आहे.

दुसर्‍या टप्प्यातील कळे ते गगनबावडा या 30 कि.मी.च्या अंतरासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या महिन्याअखेरीस अथवा सप्टेंबरच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात या निविदा खुल्या केल्या जातील. यानंतर निश्चित केलेल्या ठेकेदाराला सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये वर्क ऑर्डर दिली जाणार आहे. यामुळे या वर्षाअखेरीस अथवा नव्या वर्षात दुसर्‍या टप्प्यातील कामाला प्रारंभ होईल, अशीही शक्यता आहे. या मार्गाच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला जाणार आहे. कोणतेही अडथळे आले नाही, तर दोन वर्षांतच या मार्गाचे काम पूर्ण होईल, असे विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे आली असली, तरी भूसंपादनासह अन्य अडथळे निर्माण झाले, तर मात्र हा मार्ग पूर्णत्वाला जायला 2029 ही उजाडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (समाप्त)

तीन गावांत अद्याप मोजणी नाही

कळे ते गगनबावडा या मार्गावरील 17 गावांपैकी 14 गावांची मोजणी झाली आहे. पावसामुळे उर्वरित तीन गावांतील मोजणी रखडली आहे. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे या कालावधीत मोजणी होण्याची शक्यता आहे. मोजणी झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन करण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी लागणार आहे. या मार्गात अनेक ठिकाणी वळणदार रस्ते आहेत, यामुळे कामाची गती काहीशी कमी राहील, अशीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news