Kolhapur News | गडहिंग्लज येथे महाप्रसादातून विषबाधा; २५० हून अधिक बाधित, आरोग्य यंत्रणेची तारांबळ, जमिनीवरच रुग्णांवर उपचार

Gadhinglaj Food Poisoning | गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे येथे एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली
Gadhinglaj Food Poisoning
सांबरेतील विषबाधा घटनेनंतर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी झालेली गर्दी.Pudhari
Published on
Updated on

Gadhinglaj Food Poisoning

नेसरी : सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे शुक्रवारी दुपारी एका धार्मिक कार्यक्रमानंतर झालेल्या महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेत लहान मुले आणि महिलांसह तब्बल २५० हून अधिक नागरिक बाधित झाले असून, त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. या घटनेमुळे संपूर्ण सांबरे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सांबरे गावात शुक्रवारी सकाळी एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आजूबाजूच्या १० ते १५ खेड्यांतील नागरिक सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद सेवन केलेल्या अनेक नागरिकांना दुपारपासून उलट्या, पोटदुखी, मळमळ आणि जुलाब यासारखे त्रास जाणवू लागले. प्राथमिक अंदाजानुसार, विषबाधा झालेल्या नागरिकांची संख्या २५० पेक्षा अधिक आहे. बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरूष व वृद्धांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

Gadhinglaj Food Poisoning
Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महापालिकेला कोणी जागा देता का?

एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने लोक आजारी पडल्याने आरोग्य यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. बाधित रुग्णांना तातडीने रुग्णवाहिकांसह मिळेल त्या वाहनांतून कानडेवाडी, नेसरी, माणगाव, कोवाड येथील आरोग्य केंद्रासह गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील अनेक रुग्णांवर तातडीने उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे. आरोग्य विभागाने त्वरित गावात पथके पाठवली असून, घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत खोत, तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे यांच्यासह आरोग्य अधिकार्‍यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन बाधितांवर उपचारासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, त्रास जाणवल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विषबाधेचे नेमके कारण काय आहे, हे निश्चित करण्यासाठी महाप्रसादाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Gadhinglaj Food Poisoning
Solapur To Kolhapur High Court Bus: कोल्हापूर हायकोर्टात पोहोचा 423 रूपयांत

जमिनीवरच उपचार करण्याची वेळ

सांबरेतील विषबाधेच्या प्रकारानंतर आरोग्य केंद्रांमध्ये एकाचवेळी गर्दी झाल्याने आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली. उपचारासाठी खाटांची संख्या अपुरी पडल्याने जमिनीवरच उपचार करण्याची वेळ आली. औषधांसह अनुषंगिक गोष्टींची कमतरता निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून आली. रुग्णांच्या नातेवाईकांच्या गर्दीने रुग्णालयांचे आवार भरून गेले होते.

बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता

सांबरेतील या धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादाचा दोन हजारहून अधिक भक्तांनी लाभ घेतल्याची चर्चा आहे. कार्यक्रमाला जवळपासच्या १० ते १५ गावांतील भक्तगणांची उपस्थिती होती. सांबरे परिसरातील अनेकांना दुपारनंतर विषबाधेची लक्षणे दिसून आली. आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची संख्या मोठी होती. बाहेर गावांतील बाधितांची निश्चित संख्या रात्रीपर्यंत समजली नाही. त्यामुळे बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news