कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणारे चौघे गजाआड, दोघे फरार

कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणारे चौघे गजाआड, दोघे फरार

कोल्हापूर : गर्भलिंग निदान करून स्त्रीभ्रूण हत्या करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. मुख्य सूत्रधार युवराज गोविंद चव्हाण (वय 39, रा. प्रयाग चिखली, ता. करवीर), संजय कृष्णात पाटील (रा. वरणगे पाडळी, भोई गल्ली, ता. करवीर), हर्षल रवींद्र नाईक (रा. गंगाई लॉनजवळ, फुलेवाडी), विजय लक्ष्मण केळुसकर (मडिलगे खुर्द, गारगोटी) यांना अटक केली आहे.

आणखी दोघेजण फरारी असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे. कोल्हापूर ते आंबेवाडी-चिखली रोडवर आरोग्य विभाग आणि पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली.

याबाबतची माहिती अशी, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे युवराज चव्हाण हा गर्भलिंग तपासणी करून औषध देणार असल्याची ऑनलाईन तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी सापळा रचला. निगवे दुमाला येथे लाभार्थीच्या घरी पथक पोहोचले. तेथे चार महिन्यांची गर्भवती महिला आढळून आली. तिला दुसरीकडे बोलावून गर्भपाताचे औषध देण्यात येणार होते. त्यामुळे पथकाने विशेष गोपनीयता ठेवली. बुधवारी रात्री चव्हाण याने संबंधित गर्भवतीच्या पतीला गर्भपाताचे औषध घेण्यासाठी कोल्हापूर ते आंबेवाडी-चिखली रोडवर येण्यास सांगितले.

त्यानुसार गर्भवती महिलेचा पती, आरोग्य विभागाचे अधिकारी, पोलिस पथक कोल्हापूर ते आंबेवाडी- चिखलीकडे मार्गस्थ झाले. घटनास्थळापासून काही अंतरावर गर्भवती महिलेचा पती औषध घेण्यासाठी युवराज चव्हाण याच्याकडे गेला. पोलिसांनी सापळा रचून चव्हाण याला रात्री ताब्यात घेतले. तेव्हा चव्हाण याच्याकडे गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधाचे एक पाकीट आढळले. पथकाने त्याच्या दुचाकीची तपासणी केली. यामध्ये आणखी एक पाकीट आढळले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासणी मोहीम गतिमान केली.

पथकाने मोर्चा प्रयाग चिखलीमधील चव्हाण याच्या घराकडे वळविला. त्याच्या घराची झडती घेतली. यामध्ये गर्भपात करण्यासाठी वापरण्यात येणार्‍या औषधांची आणखी पाच पाकिटे आढळली. यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर संजय पाटील, हर्षद नाईक, विजय केळुसकर या संशयितांची नावे समोर आली. पोलिसांनी या तिघांना अटक केली. दीपक बागडी (पूर्ण पत्ता समजू शकला नाही) व आणखी एका संशयिताचे नाव समोर आले असून, त्यांच्या मागावर पोलिस आहेत.

ही कारवाई जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., पोलिस उपनिरीक्षक युनूस इनामदार, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुप्रिया देशमुख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सरिता थोरात, करवीर तालुका अधिकारी उत्तम मदने यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news