Kolhapur Tiger Sighting : 'एआय'चा गैरवापर करून वाघाचा फोटो व्हायरल; कोवाडमधील तरुणाला ठोठावला 'इतका' दंड

कोवाड ते हडलगे दरम्यान वाघ दिसल्याच्या खोट्या फोटोमुळे परिसरात उडाली होती खळबळ
AI Generated Tiger Photo
AI Generated Tiger Photo
Published on: 
Updated on: 

चंदगड : कोवाड (ता. चंदगड) ते हडलगे (ता. गडहिंग्लज) या रस्त्यादरम्यान दुचाकीवरून प्रवास करताना एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून पट्टेरी वाघ दिसल्याचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तन्मय जानबा अस्वले (मुळगाव - हडलगे, सध्या रा. कोवाड, ता. चंदगड) याला वनखात्याने १५ हजार रुपयांचा दंड लावून पुन्हा असे कृत्य न करण्यासाठी पाचशे रुपयांचे बंद पत्र लिहून घेतले. ही कारवाई सहायक वनसंरक्षक विलास काळे यांनी केली.

१२ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता तन्मय अस्वले हा कोवाड येथून नेसरी येथे ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेली आपली बहीण डॉ. ऋतुजा अस्वले यांना आणण्यासाठी जात होता. यादरम्यान चंदगड व गडहिंग्लज तालुका हद्दीवर रस्त्याचा फोटो काढला. यानंतर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून पट्टेरी वाघ आडवा जात असल्याचा फोटो तयार केला. त्यानंतर हा फोटो खरा समजून व ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी डॉ. ऋतुजा यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवला. यानंतर हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला. तपासाअंती वनअधिकाऱ्यांना हा फोटो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर (दि. १५) रोजी वनपाल सागर पवार, हडलगे गावचे पोलीस पाटील मल्लाप्पा नाईक, सरपंच हनुमंत नाईक यांच्या उपस्थितीत यांनी घटनास्थळी अस्वले बहीण भावाला बोलवून पंचनामा केला. तसेच दोघांचाही जबाब नोंदवला.

याप्रकरणी तन्मय याला दोषी धरून योग्य ती कार्यवाही करून सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांनी दंडात्मक कारवाई केली. याबाबत गडहिंग्लज येथील वनपाल सागर पोवार यांनी वन्यप्राण्यांचे चुकीच्या पद्धतीने फोटो समाजमाध्यमावर प्रसिद्ध केल्यास कडक दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.