

धामोड : पुढारी वृत्तसेवा
धामोड ता. राधानगरी येथील तुळशी मध्यम प्रकल्प ९०% भरला असुन, धरणाच्या तिन्ही वक्र दरवाजातून प्रतिसेकंद ८०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.
तुळशी धरण परिसरात गेल्या पंधरा दिवसांत २६९६ मि. मी इतका पाऊस झाला आहे, तर गेल्या चोवीस तासात २०१ मि. मी इतका पाऊस झाला आहे. धरण पहिल्यांदाच जुलै महिन्यात भरले आहे. धरणाची पुर्ण संचय पातळी ६१६.९१ मीटर असुन धरणाची सद्याची पाणी पातळी ६१५.०२ इतकी आहे. या परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने ओढ्या, नाल्यांना पूर आला आहे. तुळशीतुन पाणी सोडल्यामुळे नदी काठच्या गावांना पुराचा धोका वाढला आहे.
ओढयाच्या पाण्यामुळे तुळशी नदीवरील घुंगुरवाडी, कांचनवाडी, बाचणी आरे व बिड हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली असुन नागरीकांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.