कोल्हापूर : पूर नियंत्रणाचे गावनिहाय नियोजन करा

कोल्हापूर : पूर नियंत्रणाचे गावनिहाय नियोजन करा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संभाव्य पूरस्थितीबाबत अगोदर, दरम्यान आणि नंतर यानुसार पूरबाधित गावांचे नियोजन करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बुधवारी दिल्या. मान्सूनपूर्व कामे 31 मेपर्यंत पूर्ण करा, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने जिल्हास्तरावरील सर्व संबंधित विभागप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, नदीकाठावरील 391 पूरबाधित गावांत आवश्यक उपाययोजना राबवा. तयारीसाठी तीन आठवडे असून आवश्यक नालेसफाई, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही करा, रस्ते, पुलांचे परीक्षण करून योग्य निर्णय घ्या, नागरिक व पशुधनासाठी निवार्‍याची सोय करा. या सर्व कामांचे तातडीने नियोजन करा. यापूर्वीच्या पूरबाधित नागरिकांची नावनिहाय यादी तयार करून त्यांना आवश्यक सूचना द्या.

जर पूरस्थिती निर्माण झाली तर प्रत्येक गावात बाधितांची यादी अगोदरच तयार करून त्यांना कोणत्या निवारागृहात कोणी थांबायचे याची माहिती द्या, असे सांगत येडगे म्हणाले, निवारागृहात आवश्यक सोयीसुविधा निर्माण करा. प्रत्येक पशुधनही सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची तसेच चारा सुविधेसाठी पुरवठादारांची यादीही तयार करा. औषधे, राशन, गृहोपयोगी वस्तू प्राधान्याने मुबलक स्वरूपात पोहोचवा. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी उपाययोजना करा.

प्रत्येक टप्प्यावर काय करावे आणि काय नको याचा 'एसओपी' तयार करा, असे सांगत जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, भूस्खलन गावांची यादी तयार करा. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेटी द्या. आवश्यक उपाययोजनांची तयारी करा. अशासकीय संस्था, स्वयंसेवक आदी यादी तयार करा. जिल्ह्यात 4 मोठे, 10 मध्यम तर 56 लघू पाणी प्रकल्प आहेत, याठिकाणी आवश्यक तयारी करून पाण्याचा विसर्ग व्यवस्थित होईल यासाठी सांडवा, नालेसफाई, आवश्यक दुरुस्ती करा. जिल्हा तसेच तालुका स्तरावरील प्रत्येक यंत्रणेने पाटबंधारे विभागाशी समन्वय साधून चांगले नियोजन करा.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता शामराव कुंभार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

यंत्रणा सज्ज ठेवा; पण नागरिकांत भीती नको

पावसाचा अंदाज यावेळी चांगला आहे. यामुळे पूरस्थितीचा विचार करून सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. हे करताना नागरिकांत भीतीचे वातावरण तयार होणार नाही याचीपण काळजी घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

31 मेपूर्वी आराखडा सादर करा

आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करा. रस्ते, नदी-नाल्यांवरील पूल तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावा, असे सांगत मान्सून पूर्वतयारीचा आराखडा जिल्हास्तरावर 31 मेपूर्वी सादर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

द़ृष्टिक्षेपात जिल्हा

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1733.1 मिमी आहे. 2019 साली 2930 मिमी, 2020 साली 2034 मिमी, 2021 साली 1719 मिमी, 2022 साली 1552 मिमी, तर 2023 ला 1171 मिमी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर शहरातही मागील वर्षी 427 मिमी पावसाची नोंद झाली. 2019 च्या पुरात जिल्ह्यात 27 गावांना पूर्ण वेढा पडला होता. 318 गावे अशंत: बाधित झाली होती. 2021 साली 391 नदीकाठच्या गावांत पूरस्थिती होती. 2019 च्या पुरावेळी जिल्ह्यात 12 तालुक्यात एकूण 1 लाख 2 हजार 557 कुटुंबांना, तर 2021 मध्ये 72 हजार 411 कुटुंबांना स्थलांतरित केले होते. 2019 पासून वीज पडून 4 जणांचा पुरात वाहून गेल्याने 16 नागरिकांचा तसेच 179 लहान व 470 मोठ्या जनावारांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news