कोल्हापूर : महापूर आल्यावर जाग येणार का?

कोल्हापूर : महापूर आल्यावर जाग येणार का?
Published on
Updated on

कोल्हापूर; डॅनियल काळे : कोल्हापूर जिल्ह्यात 2019 आणि 2021 ला महापूर आला होता. यामध्ये शहरातील खानविलकर पेट्रोलपंप ते कसबा बावडा रेणुका मंदिर या रस्त्याच्या पश्चिमेला अलीकडच्या काळात उभारलेल्या मोठ्या रहिवाशी संकुलांनाही फटका बसला. सर्व इमारतींना पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. त्यावेळी या इमारतींनी बोटी घेणे, लाईफ जॅकेटची उपलब्धता करणे आदी निर्णय झाले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नाही.

यंदा पाऊस लांबला असला, तरी 1 जुलैपर्यंत पाऊस सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच धरणे पूर्ण भरल्यांनतरही पावसाचा जोर कायम राहिल्यास पूर, महापूर येऊ शकतो; पण यापूर्वीच्या अनुभवावरून सुचविलेल्या उपाययोजनांची अंमबजावणी झालेली नाही. त्यामुळे महापूर आल्यावरच आपल्याला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शिंगणापूर जॅकवेलची उंचीही वाढली नाही. महापुराचे संकट येऊन गेल्यानंतर अनेक उपाययोजना करू, अशी आश्वासने दिली जातात. स्थानिक स्वराज्य संस्थेकडूनदेखील काही उपाययोजना करण्याचे नियोजन केले जाते. जोपर्यंत महापूर आहे. तोपर्यंत त्यावर गांभीर्याने चर्चा होते. नंतर मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.

कमी वेळेत जास्तीचा पाऊस

अलीकडच्या काळातील पावसाचे निरीक्षण केले, तर पाऊस उशिरा सुरू होतो आणि कमी वेळेत जादा पाऊस पडतो. त्यामुळे एकदा का पाऊस कोसळायला सुरुवात झाली की, धो-धो पडतो. त्यामुळे सध्या पाऊस नसला, तरीदेखील गाफील राहून चालणार नाही. 8 ते 10 दिवसांतच पाऊस सरासरी पूर्ण करतो, असा मागच्या काही वर्षातला अनुभव आहे.

रस्त्यांच्या निधीचे काय झाले?

2019 आणि 2021 च्या महापुरानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांनी कोल्हापूरचे दौरे केले. महापुरात खराब झालेल्या रस्त्यांचीही पाहणी केली. केंद्र, राज्याकडून शहरातील रस्त्यांसाठी निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, शहरवासीयांच्या तोंडाला पाने पुसली. महापुराने शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लावली; पण रस्त्यांसाठी एक दमडीही मिळाली नाही.

शिंगणापूर जॅकवेलची उंची वाढविणे कागदावरच

2021 च्या महापुरात शहराला पाणीपुरवठा करणार्‍या योजनांना मोठा फटका बसला होता. पुराच्या पाण्यात उपसा केंद्र बुडाले होते. त्यामुळे 15 दिवसांहून अधिक काळ शहराचा पाणीपुरवठा बंद होता. दुरुस्त करण्यात चार ते पाच दिवसांचा वेळ गेला. त्यावेळी शिंगणापूर उपसा केंद्राची उंची वाढविण्याची चर्चा झाली होती. त्याद़ृष्टीने प्रस्तावही तयार केले. नंतर मात्र ते कागदावरच राहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news