

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे घेण्यात आलेल्या नाट्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 16 विद्यार्थ्यांनी कार्यशाळेचा लाभ घेतला. कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ रंगकर्मी जितेंद्र देशपांडे व अधिविभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी देशपांडे यांनी संहिता निवड ते सादरीकरणापर्यंतचे विविध टप्पे विविध उदाहरणांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, दिल्ली येथून नाट्य प्रशिक्षण घेतलेले प्रसिद्ध नाट्य कलाकार सलीम मुल्ला यांनी अभिनयातील बारकावे याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी अभिनयासाठी आवश्यक वेगवेगळ्या सराव पद्धती उपस्थितांना शिकविल्या. कार्यशाळेच्या तिसर्या दिवशी प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री डॉ. राजश्री खटावकर यांनी अभिनय म्हणजे काय व अभिनयाची तोंडओळख या विषयावर तर चौथ्या दिवशी रंगकर्मी व नाट्य प्रशिक्षक डॉ. संजय तोडकर यांनी नाटकातील तांत्रिक गोष्टींची तोंडओळख याविषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे संयोजनाची जबाबदारी विकास कांबळे व मल्हार जोशी यांनी सांभाळली. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी राज पाटील, रविदर्शन कुलकर्णी, किरणसिंह चव्हाण, सलीम मुल्ला आदी उपस्थित होते.