kolhapur |कोल्हापूर जिल्हा संघाला विजेतेपद; अंतिम सामन्यात पुणे संघाचा 5 गोल्सने धुव्वा

महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा
1) कोल्हापूर : विफा आयोजित आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेतील विजेता कोल्हापूर जिल्हा संघाला गौरविताना मालोजीराजे, मधुरिमाराजे, किरण चौगले, साजिद अन्सारी, माणिक मंडलिक व केएसएचे पदाधिकारी.
1) कोल्हापूर : विफा आयोजित आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेतील विजेता कोल्हापूर जिल्हा संघाला गौरविताना मालोजीराजे, मधुरिमाराजे, किरण चौगले, साजिद अन्सारी, माणिक मंडलिक व केएसएचे पदाधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर : अखेरच्या क्षणापर्यंत अटीतटीने रंगलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात बलाढ्य पुणे संघांचा तब्बल 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी धुव्वा उडवत कोल्हापूर जिल्हा संघाने महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. तृतीय क्रमांकासाठीच्या सामन्यात मुंबई संघाने नागपूर संघावर एकमेव गोलने विजय मिळवला. जैशन अहमद याने विजयी गोल केला.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) व कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) आयोजित ही स्पर्धा पोलो व छत्रपती शाहू स्टेडियमवर झाली. अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध पुणे संघांत झाला. सामन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही संघांकडून तुल्यबळ खेळ झाला. कोल्हापूरकडून आघाडीसाठी खोलवर चढायांचा अवलंब करण्यात आला. 35 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत पुणे गोलक्षेत्रात हर्ष जरगला अवैधरीत्या रोखल्याने मुख्य पंचांनी पेनल्टीचा निर्णय दिला. यावर संकेत अ. साळोखे याने गोल नोंदवून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ 41 व्या मिनिटाला संकेत साळोखे याने दुसरा गोल नोंदवून मध्यंतरापर्यंत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

उत्तरार्धातही कोल्हापूरचा आक्रमक पवित्रा कायम होता. 52 व्या मिनिटाला करण चव्हाण-बंदरे याने तिसर्‍या गोलची नोंद केली. 64 व्या मिनिटाला हर्ष जरगने चौथा गोल केला. 88 व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर संकेत साळोखे याने वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून संघाची आघाडी 5-0 अशी भक्कम केली. पुणे संघाकडून प्रसाद नाईक, सुमित काटे, सतीश हवालदार, जॉर्डन फर्नांडिस, प्रतीक साबळे यांनी गोलची परतफेड करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र कोल्हापूरच्या भक्कम बचावामुळे त्यांना एकाही गोलची परतफेड करता आली नाही. कोल्हापूर संघातील संकेत जरग, रोहित पोवार, विशाल पाटील, प्रभू पोवार, गोलरक्षक अमर गवळी यांनी उत्कृष्ट खेळ केला.

बक्षीस समारंभ ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे सदस्य व विफाचे उपाध्यक्ष मालोजीराजे व विफाच्या महिला अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्या हस्ते झाला. यावेळी सचिव किरण चौगले, सहसचिव साजिद अन्सारी, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, प्रा. अमर सासने, राजेंद्र दळवी, नितीन जाधव, भाऊ घोडके, प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते. सामन्यांचे समालोचन विजय साळोखे यांनी केले. स्पर्धेसाठी डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाचे विशेष सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news