

Kolhapur Underwater Drone: कोल्हापुरात पूरस्थिती किंवा नदी, तलावात बुडण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनांमध्ये बेपत्ता व्यक्तीचा शोध घेणे हे बचाव पथकासमोर एक मोठं आव्हान असतं. मात्र आता कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीला अत्याधुनिक असा अंडरवॉटर ड्रोन आला आहे. तब्बल दहा लाख रुपये किमतीच्या या ड्रोनमुळे बुडालेल्यांचा शोध घेणं अधिक वेगवान होणार आहे. याबाबतची माहिती पुढारी न्यूजचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी १२९ गावांना पुराचा फटका बसतो. महापुराच्या काळात तर पूरग्रस्त गावांची संख्या दुप्पट-तिप्पट होते. याशिवाय नदी, तलाव आणि शहरी भागातही पाण्यात बुडण्याच्या दुर्घटना घडतात. अशा वेळी बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पारंपरिक पद्धतींचाच आधार घ्यावा लागतो.
मात्र आता या शोधमोहिमेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. हा आहे अत्याधुनिक अंडरवॉटर ड्रोन पाण्याच्या पृष्ठभागावरून नव्हे, तर थेट पाण्याच्या आत जाऊन शोध घेण्याची क्षमता ठेवतो. ड्रोनला जोडलेल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाण्याखालील दृश्य थेट स्क्रीनवर पाहता येतात. त्यामुळे पाण्यात नेमकं काय आहे, बेपत्ता व्यक्ती कुठे असू शकते, याचा शोध घेणं शक्य होणार आहे.
पाण्याखाली जाऊन शोध घेणारा ड्रोन
कॅमेऱ्याद्वारे थेट स्क्रीनवर दृश्य
गढूळ पाण्यातही शोधमोहीम राबवण्यास मदत
रिमोट कंट्रोलद्वारे ड्रोनचे संचालन
विशेष हँड बसवल्यानंतर वस्तू पकडून बाहेर आणण्याची सुविधा
विशेष म्हणजे या ड्रोनला विशिष्ट प्रकारचा 'हँड' बसवण्याचीही सुविधा आहे. हा हँड बसवल्यानंतर पाण्याखालील वस्तू पकडून बाहेर आणणंही शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ शोधच नाही, तर बचावकार्यातही या ड्रोनची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
आतापर्यंत अशा घटनांमध्ये गळ टाकणे, काठ्या किंवा अन्य साहित्याच्या मदतीने शोध घेतला जात होता. गरज पडल्यास स्कूबा डायव्हरचीही मदत घ्यावी लागत होती. मात्र आता अंडरवॉटर ड्रोनमुळे कर्मचाऱ्यांना पाण्यात उतरून शोध घेण्याची गरज काही प्रमाणात कमी होणार आहे. आपदा मित्र आणि आपदा सखींनाही या ड्रोनच्या संचालनाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे..