

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील बहुतांश रस्त्यांवरील स्ट्रीट लाईट बंद आहेत. अनेक ठिकाणी एलईडी दिव्यांची क्षमता कमी झाल्याने तेथे अंधूक प्रकाश आहे. एकीकडे दिव्यांचा सण दिवाळी साजरा करण्यासाठी अवघे कोल्हापूर सज्ज असताना दुसरीकडे रस्त्यावरील स्ट्रीट लाईटमुळे कोल्हापूर अंधारात अशी स्थिती आहे. ऊर्जा संवर्धनासाठी करार केलेल्या कंपनीने एलईडी दिवे देणे बंद केल्याने शहरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.
राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत ऊर्जा संवर्धनासाठी शहरातील जुने पथदिवे काढून नवीन एलईडी दिवे बसविण्यासाठी खासगी कंपनीबरोबर जानेवारी 2019 ला करार करण्यात आला. करारानुसार होणार्या वीज बचतीच्या रकमेतून प्रत्येक महिन्याला 31 लाख 54 हजार 757 रुपये कंपनीला द्यायचे आहेत. सात वर्षांसाठीचा हा करार आहे. त्यानुसार 31 हजार 241 एलईडी दिवे बसविण्यात आले. सात वर्षे देखभाल-दुरुस्ती संबंधित कंपनीने करायची आहे.
दरम्यान, कंपनीने 120 वॅटऐवजी 50 वॅटचे दिवे बसविल्याचा आरोप महापालिका सभागृहात नगरसेवकांनी केला होता. त्यामुळे पहिल्यापासूनच हा प्रकल्प संशयाच्या भोवर्यात सापडला आहे. तरीही महापालिका प्रशासनाने रडतखडत प्रकल्प सुरू ठेवला. स्ट्रीट लाईटचे महिन्याला महापालिकेला सुमारे 80 लाख बिल येत होते. आता सुमारे 70 लाख येत असल्याचा अधिकार्यांचा दावा आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात विद्युत खांबांवर बसविलेल्या एलईडी दिव्यांमुळे मुख्य रस्ते उजळून निघाले होते. नागरिकांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु, नव्याचे नऊ दिवस… या म्हणीनुसारच या प्रकल्पाची अवस्था झाली. काही महिन्यांतच अनेक एलईडी दिवे बंद पडू लागले. कमी वॅटचे आणि दोन विद्युत खांबांतील अंतर जास्त असल्याने उपनगरांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
बिल थकल्याने दिवे देणे बंद…
महापालिकेने जुने पथदिवे काढून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्यासाठी मोठ्या खासगी कंपनीबरोबर 7 वर्षांसाठीचा करार केला. वास्तविक संबंधित कंपनीनेच मेंटेनन्स करायचा आहे. मात्र, संबंधित कंपनीने मेंटेनन्ससाठी दुसर्याच एका ठेकेदाराला ठेका दिला आहे. महिन्याला द्याव्या लागणार्या बिलाचे 1 कोटी 89 लाख 28 हजार 542 रु. महापालिकेने थकविले आहेत. त्यामुळे संबंधित कंपनीने मेंटेनन्स करणार्या ठेकेदाराला दिवे दिलेले नाहीत. त्यामुळे बंद पडलेले दिवे बदलले नसल्याचे सांगण्यात आले.